बदलापूर-कर्जत तिसरी-चौथी मार्गिका प्रकल्पाला हिरवा कंदील
याआधी या प्रकल्पाला आर्थिक मंजुरी मिळाली होती. आता प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठीही हिरवा कंदील देण्यात आला आहे. बदलापूर ते कर्जतदरम्यान एकूण 32.46 किलोमीटर अंतरावर उपनगरीय रेल्वे मार्गाचे चौपदीकरण केले जाणार आहे. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (MRVC) माध्यमातून अमलात आणला जाणार आहे.
सध्या या मार्गावर केवळ दोनच रेल्वे मार्गिका कार्यरत आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या धावत असताना लोकल रेल्वे सेवा तात्पुरती रोखावी लागते.गर्दी, उशीर आणि लोकल रद्द होण्याच्या समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागते.
advertisement
तिसरी आणि चौथी मार्गिका सुरू झाल्यानंतर ही अडचण दूर होणार आहे. बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी रोड आणि कर्जत येथील हजारो प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. लोकल सेवा वाढवणे शक्य होईल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगळा मार्ग उपलब्ध होईल.
यामुळे मालवाहतुकीवरही कोणताही परिणाम होणार नाही. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील 3 ते 4 वर्षांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर कल्याणपुढील रेल्वे सेवा अधिक वेगवान, सुरक्षित तसेच प्रवाशांसाठी अधिक आरामदायी ठरणार आहे.
