डोंबिवली : डोंबिवलीतील गोळवली गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका गरीब कुटुंबातील दहावीत शिकणारा मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने आई-वडिलांची काळजी वाढली आहे . पाच दिवस उलटूनही मुलाचा कोणताही पत्ता न लागल्याने कुटुंबीय चिंतेत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
बाहेर पडला अन् परतलाच नाही
मिळालेल्या माहितीनुसार हा विद्यार्थी पाच दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे शिकवणीला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. दावडी गावातील एका शाळेत तो दहावीत शिक्षण घेत असून त्याचे आई-वडील परिसरात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलगा दररोज शाळा सुटल्यानंतर सायंकाळी साडे पाच वाजता शिकवणीला जात असे आणि रात्री साडे आठ वाजता घरी परतत असे अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
त्या दिवशी रात्री नऊ वाजूनही मुलगा घरी न परतल्याने कुटुंबीयांनी घाबरून शिकवणीमध्ये फोन केला. मात्र मुलगा आज शिकवणीला आलाच नाही असे उत्तर मिळताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. पुढील चौकशीत धक्कादायक बाब समोर आली की, तो त्या दिवशी शाळेतही गेला नव्हता. ही माहिती त्याच्या वर्गमित्रांनी दिल्याचे समजते.
यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मात्र पाच दिवस उलटूनही मुलाचा शोध न लागल्याने कुटुंबीयांचा आक्रोश वाढत आहे.
