सोमवारी दुपारच्या सुमारास मेट्रोचं काम सुरू असताना अचानक पाईप लाईन फुटल्याची बातमी समोर आली. पाईप लाईन फुटल्याची माहिती समजताच पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. लगेचच एमआयडीसीकडून पाईपलाईनच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी वेळ लागणार असल्याने ठाणे आणि नवी मुंबईत काही काळ पाणी टंचाईची समस्या उद्भवू शकते. डोंबिवली- कल्याण शिळ रस्त्याजवळ असलेल्या काटई नाक्याजवळ एमआयडीसीची मोठी पाईपलाईन फुटल्याने पाण्याचे लांबच लांब फवारे उडाले. त्यामुळे काही वेळेसाठी रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते.
advertisement
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. परंतु, शहरात पाणी टंचाई होण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. एमआयडीसीची ही पाईपलाईन 1800 व्यासाची आहे. बारवी धरणातून या पाईपलाईन द्वारे ठाणे नवी मुंबई या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. पाईपलाईन फुटल्याच्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली- कल्याण शिळ रस्त्याजवळ एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रोच्या काम सुरु होतं. पण त्याचदरम्यान ही पाईपलाईन फुटली. त्यामुळे मुख्य रस्त्यावरच पाणी साचलं असून रस्त्याला तलावाचं स्वरूप आलं आहे. ही पाईपलाईन फुटल्याने वाहतूक कोंडीही झाली. दरम्यान, एमआयडीसीकडून पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी वेळ लागणार असल्याने ठाणे आणि नवी मुंबईतील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.
