मिळालेल्या माहितीनुसार, राजू पाटील यांचे धाकटे बंधू विनोद पाटील यांच्या डोंबिवलीतील राहत्या घरावर तसेच त्यांच्या कार्यालयावर इडीने एकाच वेळी छापा टाकला. सकाळपासून ईडीचे अधिकारी या ठिकाणी तपास करत आहे. राजेंद्र लोढा आणि इतरांनी आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे शाखेकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली होती.
advertisement
काय आहे प्रकरण?
विनोद पाटील यांच्यावर मुंबईतील राजेंद्र लोढा आणि इतर काही जणांसोबत मिळून आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीच्या आधारे ईडीने प्राथमिक चौकशी सुरू केली होती आणि त्यानंतर आज ही धाड टाकण्यात आली.
राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण
या कारवाईदरम्यान इडीने विनोद पाटील यांचा जबाबही नोंदवला आहे. तपास अधिकाऱ्यांकडून आर्थिक व्यवहारांची सविस्तर चौकशी करण्यात येत असून, या व्यवहारांचा स्रोत, संबंधित कंपन्यांचे खाते आणि व्यवहार याची तपशीलवार माहिती मागवण्यात आली आहे. मनसे नेते राजू पाटील हे सध्या पक्षातील महत्त्वाचे पद सांभाळत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या घरी ईडीची कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. या धाडीनंतर विरोधकांकडून मनसेवर टीकास्त्र डागले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डोंबिवलीतील या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ
ईडीकडून मात्र या प्रकरणाविषयी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. डोंबिवलीतील या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सकाळपासून नागरिक आणि स्थानिक कार्यकर्ते घटनास्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. ईडीचा पुढील तपास सुरू आहे.
राजू पाटील यांचे आर्थिक व्यवहार विनोद पाटलांकडे
राजू पाटील यांचे आर्थिक व्यवहार हे विनोद पाटील सांभाळत असल्याची माहिती आहे. राजू पाटील हे मनसे पक्षाचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले एकमेव विधानसभा उमेदवार होते. राजू पाटील यांचा जन्म 1973 साली झाला असून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. 2010 साली पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
