दरम्यान कल्याण-डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत, पण गट नोंदणीसाठी 9 नगरसेवकच बेलापूर येथील कोकण भवनमध्ये आले होते, त्यामुळे उरलेले 2 नगरसेवक हे शिंदेंच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. कोणताही दगाफटका टाळण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने निवडून आलेल्या 11 पैकी 9 नगरसेवकांना अज्ञातवासात ठेवलं होतं, पण 2 नगरसेवक नॉट रिचेबल होते.
advertisement
मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे नॉट रिचेबल झाल्यामुळे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी दोघांच्याही घरी जाऊन नोटीस दिली होती. पक्ष गट स्थापनेच्या बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे कारवाई केली जाईल, असा इशारा या नोटीसमधून देण्यात आला होता. मधुर म्हात्रे यांचे वडील आणि किर्ती ढोणे यांच्या बहिणीला ही नोटीस देण्यात आली होती, पण तरीही हे दोन्ही नगरसेवक गट स्थापनेच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
भाजप-शिवसेनेमध्ये रस्सीखेच
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे 53 आणि भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी 62 चा आकडा गाठणं गरजेचं आहे, त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेचे नगरसेवक गेम चेंजर ठरणार आहेत. मनसेसोबत युती करून सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुतीचा महापौर होईल, पण पहिली अडीच वर्ष महापौरपद भाजपला मिळालं पाहिजे, अशी मागणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. तसंच मनसे आणि ठाकरे गटाच्या काही नगरसेवकांनी आमच्यासोबत संपर्क साधल्याचा दावाही नरेंद्र पवार यांनी केला आहे.
