मदतीला धावून आला देवमाणूस
मिळालेल्या माहितीनुसार, 22 जानेवारी रोजी कल्याण रेल्वे स्थानकात मुख्य बुकिंग क्लार्क राहुल कुमार यांना त्यांच्या कार्यालयाजवळ एक जॅकेट आणि एक बॅग आढळून आली. ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ कर्तव्यावर असलेले उपस्थानक व्यवस्थापक उमेश विश्वकर्मा यांना याची माहिती दिली. त्यानंतर उपस्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही बॅग उघडण्यात आली.
advertisement
बॅग तपासणीदरम्यान त्यामध्ये 12 हजार 60 रुपये रोख रक्कम तसेच अंदाजे 4 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आढळून आले. इतकी मोठी रक्कम आणि मौल्यवान वस्तू सापडूनही रेल्वे कर्मचाऱ्यांनी कोणताही उशीर न करता संबंधित प्रवाशाचा शोध सुरू केला.
आरपीएफच्या मदतीने बॅगेतील माहितीच्या आधारे प्रवाशाचा शोध घेण्यात आला. अखेर हा प्रवासी कसारा येथून सापडला. आवश्यक चौकशी आणि ओळख पटवल्यानंतर संबंधित प्रवाशाला त्यांची संपूर्ण रक्कम आणि दागिने सुरक्षितपणे परत करण्यात आले.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिक कृतीमुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, मध्य रेल्वेच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
