डोंबिवलीतून मुंबई आणि ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनो लक्ष द्या
डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत वाहन चालकांनी जुनी डोंबिवली येथील पुलाखालून नवीन रेल्वे समांतर रस्त्याने माणकोली पुलाकडे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
advertisement
दिल्ली ते जेएनपीटी दरम्यान सुरू असलेल्या जलदगती मालवाहू रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. डोंबिवली आणि भिवंडी परिसरातील या प्रकल्पाची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. या मार्गासाठी बाधित नागरिकांना मोबदला देऊन जमीन संपादनही करण्यात आले आहे. मात्र मोठागाव रेतीबंदर येथील रेल्वे फाटक या प्रकल्पात अडथळा ठरत असल्याने येथे काम हाती घेण्यात आले आहे.
या रेल्वे फाटकाजवळ शुक्रवारपासून टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडकडून खोदकाम, भराव टाकणे आणि नवीन रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. हेच काम शनिवार आणि रविवार रात्रीदेखील सुरू राहणार असून रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे.
मोठागाव रेल्वे फाटकाचा वापर डोंबिवली शहरातून मुंबई, ठाणे आणि भिवंडीला जाणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे हा परिसर नेहमीच वाहनांनी गजबजलेला असतो. मात्र, मध्यरात्री माणकोली पुलावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने या बंदचा वाहतुकीवर फारसा परिणाम होणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सकाळी सात वाजल्यानंतर नोकरदार वर्गाची गर्दी वाढते. त्याआधी म्हणजे सकाळी सहा वाजेपर्यंत रेल्वे फाटक पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडी होणार नाही. रात्रीच्या वेळेत रेतीबंदर रेल्वे फाटक, जुनी डोंबिवली पूल मार्ग आणि नवीन रस्त्यावर वाहतूक पोलिसांचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.
कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर करावा
दरम्यान माणकोली पुलावरून रेतीबंदर रेल्वे फाटकाकडे येणाऱ्या वाहनांना नवीन कोपर छेद रस्त्यावरील जलकुंभ परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने उजवे वळण घेऊन नवीन कोपर वळण रस्त्याने जातील तसेच डोंबिवलीतून रेल्वे फाटकाकडे जाणाऱ्या वाहनांना रेतीबंदर चौकात प्रवेश बंद ठेवण्यात आला असून ही वाहने कोपर रस्ता आणि जुनी डोंबिवली पुलाखालून नवीन कोपर रस्त्याने माणकोली पुलाकडे वळवण्यात येणार आहेत.
