या घटनेनं महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दिवा पूर्वेतील बेडेकर नगर दिवा- आगासन रोड परिसरात ही चिमुकली राहात होती. 17 नोव्हेंबर रोजी चिमुकली तिच्या घरासमोर खेळत होती. खेळता खेळता चिमुकली घरासमोर असलेल्या कठड्यावर बसली आणि तितक्यात समोरून एक पिसाळलेला कुत्रा आला. त्या कुत्र्याने तिच्या खांद्याचा चावा घेतला. त्याने तिला संपूर्ण रक्तबंबाळ करून टाकलं.
advertisement
निशाच्या आई- वडिलांनी तिला रक्तबंबाळ अवस्थेत तातडीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला रेबीजचे इंजेक्शन दिले. त्या इंजेक्शनचा चौथा डोस 16 डिसेंबर रोजी देण्यासाठी तिला रुग्णालयात नेण्यात आले. शेवटचं इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर तिच्यामध्ये रेबीजचे लक्षणं दिसू लागले. ती स्वत:च्याच शरीराचे चावे घेऊ लागल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्याची माहिती दिली.
कस्तुरबा रुग्णालयामध्ये निशावर चार दिवस उपचार सुरू होते. मात्र, दिवसेंदिवस तिची प्रकृती अधिकच खालावत गेली. निशाची अशी अवस्था बघून कुटुंबियावर दु:खाचा डोंगरच कोसळला. 21 डिसेंबर रोजी (रविवारी) निशाचा करूण अंत झाला. तिच्या मृत्यूमुळे बेडेकर नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने आपल्या भाचीचा मृत्यू झाल्याचा आरोप निशाचा मामा समाधान कदम याने केला आहे. याच प्रकरणात ॲड. रोहिदास मुंडे यांनी औषधांचा दर्जा, वैद्यकीय निरीक्षण आणि संदर्भ प्रक्रियेचा तपास होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
