कल्याण : गेल्या काही वर्षांत कल्याण शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनलेली आहे. वारंवार अनेक उपाय करुनही हा प्रश्न सुटलेला नाही. मात्र शहरातील वाहतूक कोंडी आता कमी होणार आहे कारण येत्या काही दिवसात शहरातील महत्त्वाच्या पूल वाहतूकीसाठी खुला होणार आहे.
कल्याणच्या वाहतुकीत मोठा बदल
advertisement
कल्याण-शीळ मार्गावरील पत्री पूल परिसरात तिसरा उड्डाणपूल उभारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. अधिकाऱ्यांच्या मते हा पुल फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना या मार्गावरून कोंडीमुक्त प्रवास करता येईल.
कल्याण आणि डोंबिवली शहरांमधील वाहनकोंडी कमी करण्यासाठी कल्याण-शीळ मार्गाचे रुंदीकरण केले गेले आहे तसेच रस्त्याची खड्ड्यांतून मुक्तता करण्यासाठी रस्त्याचे काँक्रीटीकरण केले गेले आहे हे सर्व काम एमएमआरडीएच्या माध्यमातून चालू आहे.
ब्रिटिशकालीन पत्रीपुलाच्या जागी नवीन पूल बांधला जात आहे. या कामामुळे या भागात मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागला आहे. भविष्यात पूल दुरुस्ती दरम्यान अशी कोंडी होऊ नये म्हणून तिसरा उड्डाणपूल होणार आहे. हा पुल थेट गोविंदवाडी मार्गाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे जड वाहनांना गोविंदवाडीमार्गे रांजणोली नाक्याकडे मार्गस्थ करणे सोपे होईल.
पुलाचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. सध्या कल्याण-शीळ मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक अधिकच होत आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालक यांना मेट्रोचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.
एकदा हा तिसरा उड्डाणपूल उघडला की, कल्याण-शीळ मार्गावर वाहनांची कोंडी कमी होईल आणि शहरातील वाहतुकीची स्थिती सुधारेल. तसेच जड-हलक्या दोन्ही प्रकारच्या वाहनांना सोयीस्कर मार्ग मिळेल. यामुळे परिसरातील लोक आणि प्रवाशांना मोठा फायदा होईल, आणि शहरातील वाहतूक सुरळीत होईल.
