दीड लाख पगाराचं आमिष, दुबईला म्हणून गेलेला आकाश गायब
आकाश जगताप असे टॅक्सी चालकाचे नाव असून त्यांच्या पत्नीचे नाव अर्चना आकाश जगताप आहे. अर्चना या आपल्या सासू-सासऱ्यांसह मांजरी बुद्रुक येथे राहतात. तक्रारीनुसार गेल्या वर्षी आकाश यांनी कल्याण पश्चिमेतील भानुसागर सिनेमा परिसरातील एका खासगी कंपनीकडे दुबईत टॅक्सी चालकाची नोकरी मिळावी यासाठी अर्ज केला होता. कंपनीकडून दुबईत चांगल्या पगाराची नोकरी मिळेल असे सांगण्यात आले होते.
advertisement
जानेवारी 2025 मध्ये आकाश दुबईला गेले. सुरुवातीच्या काही महिन्यांत ते आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात होते. मात्र ऑक्टोबर 2025 पासून त्यांचे दोन्ही मोबाइल क्रमांक अचानक बंद झाले. त्यानंतर कुटुंबीयांचा त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.
पतीशी संपर्क होत नसल्याने चिंतेत असलेल्या अर्चना जगताप यांनी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांशी भेट घेऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
या सर्व प्रकारामुळे दुबईत नोकरीच्या नावाखाली आपल्या पतीची मानवी तस्करी झाली असावी आणि त्यांना तेथे डांबून ठेवले असण्याचा संशय अर्चना जगताप यांनी व्यक्त केला आहे. अखेर त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे
