नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता संतोष जाधव (वय 58) या भिवंडीतील अंबाडी परिसरातील डाकिवली भागात राहतात. मंगळवारी त्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी कल्याण येथे गेल्या होत्या. मुलीला भेटून परत येताना त्यांनी कल्याण येथून भिवंडीकडे जाणारी रिक्षा घेतली. रिक्षामध्ये त्या एकट्या नसून आणखी एक पुरुष सहप्रवासी होता.
कल्याण ते भिवंडीतील वंजार पट्टी नाका या दरम्यान प्रवास सुरू असताना सहप्रवाशाने संधी साधत संगीता जाधव यांच्या गळ्यातील सुमारे 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी आणि त्यांच्या पर्समधील 1 हजार रुपये रोख रक्कम चोरली. प्रवासादरम्यान महिलेच्या ही बाब लक्षात आली नाही. मात्र रिक्षेतून उतरल्यानंतर दागिने आणि पैसे नसल्याचे समजताच त्यांनी तात्काळ शोधाशोध केली.
advertisement
यानंतर त्यांनी निजामपूरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवला असून सीसीटीव्ही फुटेज आणि रिक्षा चालकाच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करताना अधिक सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
