कल्याणमध्ये रॅपीडो चालकांवर कारवाई
कल्याणमध्ये मोटार वाहन अधिनियमाचे उल्लंघन करून नियमबाह्य पद्धतीने रॅपिडो बाईक-टॅक्सी सेवा देणाऱ्या चालकांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. परवानगी न घेता सेवा देणाऱ्या एकूण 47 दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून मिळून सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईची माहिती कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली.
advertisement
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 93 यानुसार कोणत्याही चालकाने किंवा बाईक-टॅक्सी सेवाधारकाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी परिवहन विभागाकडून आवश्यक परवाना घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम 2025 नुसार संबंधित अॅग्रिगेटर कंपन्यांनी ठरवलेल्या अटी आणि नियमांची पूर्तता केल्यानंतरच त्यांना अधिकृत परवाना दिला जातो. परंतु हे नियम मोडून रॅपिडोसोबत ओला आणि उबरसारखे प्लॅटफॉर्म नियमबाह्यरीत्या दुचाकीद्वारे प्रवासी वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे.
यामुळेच परवानगीशिवाय चालणाऱ्या रॅपिडो बाईक-टॅक्सींच्या विरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान अनेक बाईकचालकांकडे वैध परवाना नसल्याचे आढळून आले. यानंतर संबंधित चालकांवर दंड वसूल करण्यात आला.
याप्रकरणी फक्त चालकांवरच नाही तर रॅपिडो कंपनीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅपिडो आणि त्याचे संचालक यांच्याविरोधातही महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नियमांकडे दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक चालवण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे ही कृती आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
