कल्याण : मुंबईसह त्याच्या उपनगरात मेट्रोचे मोठे जाळे वेगाने पसरत आहे. या मेट्रो प्रकल्पाचा एक भाग म्हणजे कल्याण ते पेंधर (नवी मुंबई)मेट्रोचे काम आता वेगाने पूर्ण होत आहे.
कल्याण ते पेंधर मेट्रो मार्गिकेच्या कामाचा डोंबिवली एमआयडीसी मेट्रो स्थानकाजवळ नुकताच शंभरावा गर्डर उभारण्यात आला आहे. हा टप्पा प्रकल्पातील महत्त्वाचा भाग असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. एकूण 19 स्थानकांच्या या मार्गिकेच्या उभारणीसाठी सध्या विविध ठिकाणी काम जोरात सुरू आहे.
advertisement
कशी असणार ही मार्गिका?
एमएमआरडीएने कल्याण, डोंबिवली आणि तळोजा औद्योगिक वसाहतीमार्गे नवी मुंबईला जोडणाऱ्या या मेट्रो मार्गिकेची आखणी केली आहे. सुरुवातीला ही मार्गिका तळोजापर्यंत मर्यादित होती. मात्र, नवी मुंबई मेट्रोच्या पेंधर स्थानकाशी थेट जोड मिळावी, यासाठी मार्गिकेच्या आराखड्यात बदल करण्यात आला. तळोजापासून सुमारे चार किलोमीटर पुढे असलेल्या पेंधरपर्यंत मार्ग वाढवून नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. परिणामी आता ही मेट्रो 12 एकूण 23.57 किलोमीटर लांबीची असून कल्याण ते पेंधर अशी धावणार आहे.
ही मेट्रो मार्गिका कल्याण-शिळफाटा-तळोजा या मुख्य रस्त्याला समांतर धावेल. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडून येणार आहेत. कल्याण येथे ही मार्गिका बांधकामाधीन ठाणे-कल्याण मेट्रो मार्गिका 5 शी जोडली जाणार आहे. तसेच हेदूटणे येथे विक्रोळी-बदलापूर प्रस्तावित मेट्रो मार्गिका 14 शी, अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो मार्गिका 1 शी आणि कल्याण जंक्शन रेल्वे स्थानकाशी थेट जोड मिळणार आहे.
ठाणे-कल्याण मेट्रो 5 ही पुढे घाटकोपर–वडाळा मेट्रो 4 शी संलग्न असून वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान मेट्रो 11 या भूमिगत मार्गिकेचेही काम सुरू आहे. त्यामुळे मेट्रो 12 ही उत्तर ते दक्षिण अशा सुमारे 13 मेट्रो मार्गिकांशी जोडली जाणार आहे. एमएमआरडीएच्या माहितीनुसार हा संपूर्ण प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
कोणती स्थानक असण्याची शक्यता?
मेट्रो 12 मध्ये कल्याण, बाजार समिती, गणेशनगर, पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागांव, सोनारपाडा, मानपाडा, हेदूटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली (खुर्द), बाले, वाकलान, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि अमनदूत अशी 19 स्थानके प्रस्तावित आहेत. या मार्गिकेमुळे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक जलद, सोपा आणि सुरक्षित होणार आहे.
