कल्याण पश्चिममधील दुर्गाडी किल्ल्याजवळ ही घटना घडली आहे. विलास भागित नावाचे आरटीओ पोलीस दुर्गाडी किल्ल्याजवळच्या चौकामध्ये बंदोबस्तासाठी तैनात होते. आपली ड्युटी करत असताना चौकामध्ये काही तरूणांनी त्यांची कार विरूद्ध दिशेच्या रस्त्याने घातली. त्यामुळे त्यांनी लगेचच त्या कारचालकाला बाजूला थांबवलं. "तुम्ही विरुद्ध दिशेने का गाडी घातली ?" असा जाब त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कार चालकाला विचारला. त्यामुळे त्या कार चालकाने पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालायला सुरूवात केली. त्या कारमध्ये चौघेजण होते. त्यामुळे ते चौघेही आरटीओ पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद घालू लागले.
advertisement
कार ड्रायव्हर आपली चूक मान्य न करता पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालायला लागला. त्यांचा आपआपसातील वाद एवढा विकोपाला गेला की, कारमध्ये बसलेल्या त्या चौघांनीही आरटीओ पोलीस कर्मचारी विलास भागित यांच्यावर हल्ला केला. त्या चौघांनीही आरटीओ पोलीसाला इतकं बेदम मारहाण केली की, थेट गंभीर जखमी केले. सध्या सोशल मीडियावर त्यांनी मारहाण करतानाचा आणि गोंधळ घातल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. प्रकरणाला आणखीन तोंड फुटण्याआधीच त्या तरूणांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलीसांच्या तावडीत सापडण्याआधीच ते चौघेही तिथून पसार झाले, त्यामुळे त्यांचा शोध घेतला जातोय.
सध्या भागित यांना कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कल्याण बाजारपेठ पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडे त्या कारचा सुद्धा नंबर देखील आहे. त्याप्रमाणेच पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मारहाण करणारे हे शहाड परिसरातील राहणारे असून ते चौघेही शिवसेना शिंदे गटाचे समर्थक असल्याची माहिती आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी देखील गेले होते. त्यांच्या घराची झडती घेतली तरीही ते सापडले नाही. पोलिसांनी त्या चारही आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांची दोन पथकं पाठवली आहेत.
