वालधुनी उड्डाणपूल पुन्हा सुरू
कल्याणमधील हा पुल सोमवारपासून पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मूळतहा 20 दिवस पूल बंद ठेवण्याची परवानगी वाहतूक पोलिसांकडून घेण्यात आली होती. मात्र, महापालिकेच्या प्रयत्नांमुळे अवघ्या आठ दिवसांतच दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केडीएमसीकडून वालधुनी पुलावर दुरुस्ती हाती घेण्यात आली होती. या कामासाठी 20 डिसेंबर ते 10 जानेवारीदरम्यान पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. पुलावर 24 तास युद्धपातळीवर काम सुरू ठेवण्यात आले. विशेषतहा रात्रंदिवस काम करून दुरुस्ती वेळेआधीच पूर्ण करण्यात आली.
advertisement
हा उड्डाणपूल कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. पूल बंद असल्यामुळे या कालावधीत परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असल्याने दैनंदिन प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत होता.
वाहनचालकांना होणारा त्रास लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या कामावर विशेष लक्ष दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित यंत्रणांनी दुरुस्तीचे काम गतीने पूर्ण केले. त्यामुळे अपेक्षेआधीच पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने नागरिकांनी आणि वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
