खंबाळपाडा परिसरातील जलकुंभाच्या जलवाहिनीला लागलेली मोठी गळती थांबवण्यासाठी तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेने मंगळवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या मोहिली उदंचन केंद्रामार्फत उल्हास नदीतून पाणी उचलून 150 दशलक्ष लिटर नेतिवली जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाणी शुद्ध करून डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागास पाणी पुरवठा केला जातो. केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत खंबाळपाडा परिसरात बांधण्यात आलेल्या उंच जलकुंभाचे इनलेट मुख्य जल वाहिनीस जोडणी केलेल्या टॅपिंगच्या ठिकाणी पाणी गळती होत असल्याने सदर गळती थांबविण्यासाठी पॅच क्लॅम्प काढून काही दुरूस्ती करून पुन्हा बसवायचे आहे.
advertisement
दुरूस्तीचे काम करण्यासाठी मंगळवार दि. 30 डिसेंबर 2025 रोजी, सकाळी 09:00 ते रात्री 09:00 वाजेपर्यंत 12 तास नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागामध्ये होणारा पाणी पुरवठा बंद राहणार (शट डाऊन) आहे. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून नागरिकांना सोमवारीच पाणी भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाणी पुरवठा बंद असण्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, बुधवारी सकाळी पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच, डोंबिवली पूर्व आणि पश्चिममधील नागरिकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली. पालिकेने असे देखील नमुद केले की, दुरूस्तीचे काम शक्य तितके लवकर पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन पालिकेने नागरिकांना दिले.
