कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकूण 122 जागा आहेत. या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांची युती झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र निवडणूक लढत आहेत. भाजप-शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे अनेकांना तिकीट मिळालं नाही आणि नाराजांची संख्या वाढली. या नाराजांना मनसेने हेरलं आणि त्यांना थेट एबी फॉर्म दिला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसे 49 आणि उद्धव ठाकरेंची शिवेसना 73 जागांवर लढत आहे.
advertisement
शिवसेनेतून भाजप अन् तिथून मनसे
मनसेच्या यादीमध्ये आणखीही मोठी नावे आहेत. शीतल मंढारी या शिवसेनेच्या माजी नगरसेविका होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र भाजपकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी अर्जही दाखल केला. मनसेचे माजी नगरसेवक असलेल्या अनंत गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण दोन दिवसांमध्येच त्यांनी पुन्हा मनसेमध्ये पुनर्प्रवेश करत मनसेचा एबी फॉर्म घेऊन अर्ज दाखल केला आहे.
शिवसेना कल्याण ग्रामीण तालुका उपप्रमुख आणि माजी सरपंच जयंत पाटील तसंच त्यांची मुलगी काजल जयंत पाटील यांनी आज मनसेमध्ये प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जयंत पाटील हे मागच्या 20 वर्षांपासून शिवसेनेमध्ये कार्यरत होते.
कल्याण-डोंबिवलीत मनसेचं इंजिन सुस्साट, भाजपचं अख्ख घराणं फोडलं, नवरा-बायको-पोरीलाही उमेदवारी!
शिवसेनेचे पदाधिकारी अमोल पाटील आणि त्यांच्या पत्नी लीना पाटील यांनीही आज मनसेमध्ये प्रवेश करून अर्ज दाखल केला. डोंबिवली पश्चिममधील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी संदेश पाटील आणि त्यांची पत्नी रसिका संदेश पाटील यांनी अनेक वर्षे शिवसेनेत काम केले होते, पण शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी मनसेमध्ये प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला.
मागच्या काही महिन्यांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू होते, पण निवडणुकीच्या तोंडावर युती ठरल्यानंतर अनेक इच्छुकांना तिकीट न मिळाल्याने असंतोष उफाळून आला. या नाराज पदाधिकाऱ्यांना मनसेने पक्षात घेऊन थेट एबी फॉर्मच देऊन टाकला. आता मनसेची ही खेळी त्यांना यश मिळवून देते का? हे 16 तारखेला लागणाऱ्या निकालातच स्पष्ट होईल.
