कल्याण-डोंबिवलीमध्ये जागावाटपामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. कल्याण पूर्वच्या 7 जागा पश्चिमेत 8 जागा दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचे कार्यालयाबाहेर कालपासून आंदोलन सुरू होते. युती नको, मैत्रीपूर्ण लढत घ्या, या मागणीवर कार्यकर्ते ठाम आहेत. अखेर रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीतल्या निवासस्थानी पूर्व आणि पश्चिम मधील आमदार, माजी आमदार आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.
advertisement
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आहे त्या जागांवर समाधान मान आणि युतीमध्येच लढा, अशा सूचना रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलामध्ये शिवसेनेला 67 आणि भाजपला 54 जागा मिळाल्या, पण जागा वाटप ठरल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयात कार्यकर्ते जमले आणि स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. कल्याण पूर्वमध्ये भाजपला फक्त 7 जागा देण्यात आल्या आहेत, हे चुकीचे आहे, आम्हाला युती नको अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या.
कार्यकर्त्यांची आणि इच्छुक उमेदवारांची समजूत घालण्यासाठी भाजपा जिल्हा अध्यक्ष नंदू परब आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी नरेंद्र सूर्यवंशी कार्यालयात दाखल झाले. मात्र कार्यकर्ते काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. निवडणूक भाजपाने स्वबळावर लढावी, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा केली होती. त्यानुसार भाजपनेही स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
