कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 122 जागा आहेत. महायुतीमध्ये एबी फॉर्म वाटपावरून महायुतीमध्ये नाराजी पसरली आहे. महायुतीचे काही माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते एबी फॉर्म न मिळाल्यामुळे नाराज झाले आहेत. अशातच काही इच्छुकांनी थेट मनसेकडून एबी फॉर्म आणत उमेदवारी अर्ज भरले आहेत.
कल्याण-डोंबिवलीमध्ये काही ठिकाणी शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी परस्पर विरोधात फॉर्म भरल्यामुळे एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीमधील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बंडखोरी शमवण्यासाठी पक्षातील वरिष्ठांची कसोटी लागणार आहे.
advertisement
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर उद्या म्हणजेच 31 डिसेंबर 2025 ला अर्जांची छाननी होणार आहे, त्यानंतर 2 जानेवारीला उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत, त्यामुळे भाजप-शिवसेना महायुतीला नाराजांची बंडखोरी थंड करायला पुढचे 3 दिवस मिळणार आहेत. या नाराजांचं बंड शमवण्यात यश आलं नाही तर महायुतीची डोकेदुखी वाढू शकते.
भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन
कल्याण-डोंबिवलीमध्ये जागावाटपावरून महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेला जास्त जागा दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ घातला आणि निवडणूक स्वबळावर लढवण्याची मागणी केली, यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष जे स्वत: डोंबिवलीचे आमदार आहेत, त्यांनी तातडीची बैठक घेऊन कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
