भारत-पाकिस्तान युद्धात यांचा सहभाग
उभारण्यात येणाऱ्या या स्मारकाची संकल्पना भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी तसेच पद्मश्री गजानन माने यांची आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात माने यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. देशसेवा, त्याग आणि शौर्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, तरुणांनी सैन्यदलात दाखल व्हावे आणि राष्ट्ररक्षणात योगदान द्यावे या भावनेतून त्यांनी हा प्रकल्प मांडला. त्यांच्या या संकल्पनेला गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी तत्कालीन आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी परवानगी दिली आणि वॉर मेमोरिअलच्या कामाला अधिकृत मुहूर्त मिळाला.
advertisement
कल्याण-डोंबिवली परिसरातून अनेक तरुण सैन्यात दाखल झालेले आहेत. देशाला नेहमीच तरुण, सक्षम आणि समर्पित सैनिकांची गरज असते. विद्यार्थ्यांना सैन्यदलाचे महत्त्व समजावे शिवाय त्यांच्यात कर्तव्यभावना आणि देशभक्ती दृढ व्हावी, यासाठी हा प्रकल्प मोठी भूमिका बजावणार आहे. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हे स्मारक एक प्रेरणादायी स्थळ ठरेल, जिथे ते सैनिकांच्या शौर्यकथा जाणून घेऊ शकतील.
सैनिक शहीद झाल्यास याठिकाणी देता येणार मानवंदना
यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरात भविष्यात एखादा सैनिक शहीद झाल्यास त्यांच्या नातेवाइकांना या स्मारकात येऊन मानवंदना देता येईल.
या प्रकल्पाला गती देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तब्बल 2 कोटी 70 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लवकरच होणारे लोकार्पण हे डोंबिवलीकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे. देशसेवा, शौर्य आणि देशभक्तीचे प्रतीक असलेले हे स्मारक शहरातील नागरिकांना नवी प्रेरणा देईल.
