सध्या या उड्डाणपुलाचा विस्तार करण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त यांनी या कामासाठी आवश्यक प्रशासकीय मंजुरी मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ काम सुरू करण्यात येईल,अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
प्रकल्पबाधितांना रोख स्वरूपात मोबदला मिळणार
या प्रकल्पात काही घरे आणि दुकाने बाधित होणार आहेत. प्रकल्पबाधितांना घर किंवा जागा देण्याऐवजी रोख स्वरूपात मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना पुनर्वसनाच्या ताणातून सुटका मिळणार आहे.
advertisement
मोठा गाव रेल्वे फाटक परिसर हा डोंबिवलीतील एक महत्त्वाचा मार्ग आहे. या फाटकावरून दररोज हजारो वाहने आणि प्रवासी जातात. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असते. त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना वेळेत प्रवास करणे अवघड जाते.
चार पदरी झाल्यानंतर वाहतुकीचा ताण कमी होईल, रस्त्यांची रुंदी वाढेल आणि प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल. या कामामुळे केवळ डोंबिवलीच नव्हे तर कल्याण आणि ठाणे दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनाही दिलासा मिळेल. प्रशासनाचा दावा आहे की या प्रकल्पामुळे शहरातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार असून नागरिकांना अनेक वर्षांपासूनचा वाहतूक कोंडीचा त्रास अखेर संपणार आहे.
