20 रुपयांत डोंबिवलीतून ठाण्यात
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मार्ग क्रमांक 82 अंतर्गत नवी बससेवा सुरू करण्यात आली आहे. डोंबिवली – मोठागाव – स्वामीनारायण सिटी ते ठाणे अशी ही नवी बससेवा असेल. विशेष म्हणजे सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत दर तासाला एक फेरी होणार असून तिकीट दर केवळ 20 रुपये असणार आहे. ही बस माजिवडा येथे थांबा घेणार असल्याने मेट्रो आणि इतर वाहतूक सुविधांसाठी देखील फायद्याचे ठरणार आहे. बोरिवली, नवी मुंबई तसेच मेट्रोने पुढील प्रवास करणाऱ्यांसाठी देखील ही बस सेवा लाभदायी ठरेल.
advertisement
कसं असेल बसचं वेळापत्रक
डोंबिवली मोठागाव स्वामीनारायण सिटी ते ठाणे या बस सेवा उपक्रमात रोज 40 फेऱ्या होणार आहेत. स्वामीनारायण सिटी येथून पहिली बस सकाळी 7.15 आणि शेवटची बस सायंकाळी 6.45 वाजता सुटेल. या बसचा ठाण्यातील माजिवडा जंक्शन येथे शेवटचा थांबा असेल. माजिवडा जंक्शन येथून स्वामीनारायण सिटीला पहिली बस सकाळी 8.15 आणि शेवटची बस सायंकाळी 8.15 वाजता सुटेल.
दरम्यान, डोंबिवली ते ठाणे दरम्यानच्या लोकलला सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी असते. या गर्दीमुळे प्रवाशांच्या अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. आता नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या बस सेवेमुळे प्रवाशांना कमी पैशात आरामदायी प्रवास होणार आहे.
