2016 मध्ये काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, 2016 साली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर मारहाण प्रकरणात कांबळे बंधूंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना जामीन मंजूर झाला.मात्र जामिनाच्या अटींचे उल्लंघन करत ते न्यायालयात हजर राहिले नाहीत आणि जानेवारी 2023 पासून फरार झाले.
वारंवार समन्स बजावूनही आरोपी हजर न राहिल्याने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 17 जानेवारी 2023 रोजी त्यांच्या अटकेसाठी जाहीरनामा काढला. तरीही हे दोघे तीन वर्षांहून अधिक काळ पोलिसांना चकवा देत होते. या काळात त्यांनी आपले राहण्याचे ठिकाण पाच ते सहा वेळा बदलले होते.
advertisement
पोलिसांना गुंगारा देणाऱ्या 'त्या' फरार भावांना अटक
पण गुप्त बातमीदारामार्फत कांबळे बंधू सध्या भिवंडीतील काल्हेर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिस शिपाई गोरक्ष शेकडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांच्यासह पथकाने काल्हेरगाव येथे हल्दीराम गोदामाच्या मागे, सी.जी. पार्कजवळ सापळा रचला. योग्य नियोजन करून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. सध्या पुढील चौकशी सुरू असून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
