सह्याद्रीच्या कुशीत वसलेला मलंगगड
ठाणे जिल्ह्यातील मलंगगड हे हिंदू आणि मुस्लिम भाविकांचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या या गडावर जाण्यासाठी आतापर्यंत भाविकांना कठीण अशी दोन तासांची चढण चढावी लागत होती. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी हा प्रवास अतिशय त्रासदायक ठरत होता. ही अडचण लक्षात घेऊन अंबरनाथचे तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी स्वित्झर्लंडच्या धर्तीवर मलंगगडावर फ्युनिक्युलर रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
advertisement
फ्युनिक्युलर रेल्वे सेवा
सार्वजनिक बांधकाम विभागाने सप्तशृंगी वणीगड आणि मलंगगड या दोन्ही ठिकाणी फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिल्यानंतर कामाला सुरुवात झाली. वणीगडावरील सेवा सुरू झाली असली तरी मलंगगडाचा प्रकल्प विविध अडथळ्यांमुळे बराच काळ रखडला होता. अखेर सर्व अडचणी दूर झाल्यानंतर मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे सेवा सुरू झाली आहे.
नेमकं असं काय आहे खास?
या मार्गावर दोन फ्युनिक्युलर ट्रेन धावणार असून प्रत्येक ट्रेनला दोन प्रशस्त डब्बे आहेत. या सेवेच्या माध्यमातून दर तासाला सुमारे 1200 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. भाविकांचा प्रतिसाद पाहून ही सेवा 24 तास सुरू ठेवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवेज कंपनीच्या व्यवस्थापनाने दिली आहे. या संपूर्ण व्यवस्थेसाठी सुमारे 70 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत
