मिळालेल्या माहितीनुसार, घनश्याम गोपलानी (वय 53) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये विरल शाह, पारुल शाह, शेरनिक दोषी आणि आयुषी यांनी गोपलानी यांची डोंबिवली पूर्वेतील रामनगर परिसरातील श्री सत्यनारायण ट्रेडर्स या दुकानात भेट घेतली. या चौघांनी दावडी आणि गिरगाव येथे स्पेअर पार्ट्सचे मोठे गोदाम असल्याचा दावा केला.
advertisement
व्यवसायातील भागीदारीचे आमिष ठरले महागात
चारचाकी वाहनांचे ऑटो पार्ट्स मोठ्या प्रमाणावर साठवले असून हा व्यवसाय अत्यंत फायदेशीर असल्याचे भासवण्यात आले. या व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष दाखवत चौकडीने गोपलानी यांच्याकडून टप्प्याटप्प्याने दीड कोटी रुपये घेतले.
मात्र ही रक्कम व्यवसायासाठी न वापरता आरोपींनी मुंबईत घर खरेदी केल्याचे गोपलानी यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी पैसे परत मागितले. त्यावेळी आरोपींकडून केवळ साडेचार लाख रुपये परत करण्यात आले.
उर्वरित रक्कम मागितल्यावर आरोपी विरल शाह याने आत्महत्या करण्याची तसेच खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रामनगर पोलीस करत आहेत.
