कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरामध्ये, अजय स्टील नावाच्या दुकानात शिवशाही प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिलांच्या एका कार्यक्रमासाठी लकी ड्रॉमध्ये देण्यासाठी भांडी खरेदीकरिता गेले होते. मात्र दुकानदाराने भांड्यांचे दर जास्त सांगितल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी इतर दुकानातून भांडी घेऊ असे सांगत दुकानाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याच गोष्टीचा राग आल्यामुळे दुकान मालक, त्याची पत्नी आणि मुलीने पदाधिकाऱ्यांना अपशब्द वापरत शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर संबंधित संघटनेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना घटनास्थळी बोलावण्यात आले.
advertisement
महिलांकडून दुकानदारांच्या वर्तणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. परप्रांतीय दुकानदारांनी महिलांना पुढे करून मराठी नागरिकांशी गैरवर्तन करणे चुकीचे असल्याचा आरोप करत महिलांनी दुकानात जोरदार गोंधळ घातला. तब्बल एक ते दीड तास महिलांनी दुकानात ठिय्या देत दुकानदाराला जाब विचारला. अखेर परिसरातील स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाल्यानंतर वाद मिटवण्यात आला. या घटनेमुळे काही काळ कोळसवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सध्या परिस्थिती शांत असल्याची माहिती आहे.
