कल्याण-डोंबिवली स्थानकातील धक्कादायक चित्र समोर
रेल्वे स्थानकांवरील चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असताना विशेषतहा कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. गेल्या अवघ्या बारा दिवसांत तब्बल 40 प्रवाशांचे मोबाइल फोन चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकारांमुळे दररोज प्रवास करणाऱ्या तसेच लांब पल्ल्याच्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
दररोजचा प्रवास ठरतोय त्रासदायक
रेल्वे स्थानकांवरील गर्दीचा गैरफायदा घेत हे चोर प्रवासी असल्याचे भासवून वावरत असतात. गाडीत चढण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांच्या पिशव्या, खिशे किंवा हातातील मोबाइल फोन अत्यंत सफाईने काढून ते पसार होतात. काही वेळा प्रवाशांना चोरी झाल्याचे उशिरा लक्षात येते तोपर्यंत चोर फरार झालेला असतो.
कल्याण रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन असल्याने येथे दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अनेक प्रवासी लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांची प्रतीक्षा करत रात्री उशिरापर्यंत प्लॅटफॉर्म किंवा स्थानक परिसरात थांबतात. याच संधीचा फायदा घेत चोरटे झोपलेल्या किंवा थकलेल्या प्रवाशांना लक्ष्य करतात आणि त्यांच्या मौल्यवान वस्तू लंपास करतात.
या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून रेल्वे पोलिसांनी गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणा अधिक प्रभावी करावी तसेच संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
