प्रवाशांचा टप्प्याटप्प्याचा प्रवास होणार का बंद?
भुसावळ-मुंबई दरम्यान लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या असल्या तरी जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना त्यामध्ये अनेकदा जागा मिळत नाही. त्यामुळे प्रवासी भुसावळ-इगतपुरी मेमूने इगतपुरीपर्यंत जातात. त्यानंतर कसारा गाठण्यासाठी दुसरी रेल्वे, बस किंवा खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. कसाऱ्याहून पुढे मुंबईसाठी लोकल रेल्वेने प्रवास केला जातो.
या टप्प्याटप्प्याच्या प्रवासामुळे गाड्या बदलताना अडचणी निर्माण होतात. अनेक वेळा वेळेचे नियोजन बिघडते आणि खर्चही वाढतो. जर भुसावळहून सुटणारी मेमू रेल्वे थेट कसारापर्यंत चालवण्यात आली तर भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईसाठी परवडणारी आणि अनारक्षित रेल्वे मिळू शकते.
advertisement
ही मेमू सेवा विशेषत विद्यार्थी, नोकरदार, छोटे व्यापारी आणि प्रवाशांसाठी मोठी सोय ठरणार आहे. कसाऱ्याहून मुंबईकडे लोकल रेल्वेची चांगली सोय उपलब्ध असल्याने प्रवास अधिक सुलभ होईल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई यांमधील दळणवळण अधिक वेगवान होईल असा विश्वास प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे.
