जोधपूर एक्सप्रेसमधल्या प्रवाशांनी आपलं सामान चोरीला गेल्याचा आरोप करत एक्सप्रेसची चैन खेचली होती. अंबरनाथ रेल्वे स्थानकावरून ट्रेन बदलापूरच्या दिशेने ट्रेन निघाली होती. बदलापूरच्या दिशेने एक्सप्रेस जात असताना काही प्रवाशांनी आपलं सामान चोरीला गेल्याचा आरोप करत रेल्वेची चैन खेचली. बदलापूर स्थानकावर ट्रेन थांबवत अनेक प्रवाशांनी चांगलाच गोंधळ घातला. हा सर्व प्रकार काल मध्यरात्री 12च्या सुमारास घडला. या गोंधळामुळे पाठीमागून येणारी सीएसएमटी बदलापूर लोकल रखडली त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसल्याचं समोर आलं आहे.
advertisement
अनेक प्रवाशांनी त्यांचं सामान चोरीला गेल्याची तक्रार करूनही रेल्वे प्रशासनाकडून योग्य ती उत्तरं मिळत नसल्यामुळे प्रवासी संतापले होते. तर काही प्रवाशांनी एक्सप्रेसमधील टॉयलेटचे दरवाजे लॉक असल्याचा आरोपही केलाय. दरम्यान काही रेल्वे अधिकाऱ्यांनी आणि रेल्वे पोलिसांनी या प्रवाशांची कशीबशी समजूत घातल्यानंतर जोधपुर एक्सप्रेस पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली. मात्र याचा फटका पाठीमागून येणाऱ्या सीएसएमटी- बदलापूर, सीएसएमटी- अंबरनाथ आणि सीएसएमटी- खोपोली या लोकलला बसला. सर्वच लोकल उशिरा पोहोचल्यामुळे लोकलमधील प्रवाशांना चांगलाच नाहक त्रास सहन करावा लागला.
