डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील एका चेंबरमधून आता थेट भगवा रंगाचा धूर पडताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय, फोटोज् सुद्धा व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये, MIDC परिसरामध्ये असलेल्या सागाव परिसरातील चेंबरमधून भगवा रंगाचा धूर बाहेर निघत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे परिसरातील हवेच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून गंभीर प्रश्न निर्माण केले जात आहेत.
advertisement
स्थानिक नागरिकांच्या मते, रात्रीच्या वेळी औद्योगिक सांडपाणी आणि रासायनिक वायू सोडले जात असल्याचा संशय आहे. ड्रेनेज आणि चेंबरमधून भगवा रंगाचा धूर निघत असल्यामुळे आजूबाजूच्या भिंती भगव्या रंगाच्या झाल्याचे पहायला मिळत आहे. हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरत असल्याने नागरिकांमध्ये आरोग्याविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास आणि डोळ्यांची जळजळ अशा तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे नागरिक सांगतात.
MIDC ने आखून दिलेले नियम फक्त कागदापूरतेच आहेत का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. एमआयडीसीमधील स्थानिक नागरिकांकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे, स्थानिक प्रशासनाकडे, आमदारांकडे आणि खासदारांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. व्हिडिओची दखल घेत तत्काळ तपासणी करून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. डोंबिवली MIDCमधील प्रदूषणावर प्रशासन काय भूमिका घेते आणि व्हायरल व्हिडिओमागचे सत्य काय, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
