प्रदीप किसन भोईर (वय ३०) असं या तरुणाचं नाव आहे. त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. प्रदीप हा कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरातील हरीओम सोसायटीमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास प्रदीप घरातून बाहेर पडला. त्यानंतर काही वेळाने त्याने व्हॉट्सअॅपवर एक स्टेट्स अपलोड केला. आई बाबा मला माफ करा, असा मेसेज तरुणाने स्टेटसवर ठेवला होता. हा मेसेज प्रदीपचा भाऊ रमाकांत भोईर याने पाहिला. मेसेज वाचताच त्याला संशय आला आणि त्याने तातडीने कुटुंबीयांच्या मदतीने प्रदीपचा परिसरात शोध सुरू केला, परंतु प्रदीप कुठेही सापडला नाही.
advertisement
अखेरीस, कुटुंबीयांनी महात्मा फुले चौक पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली आणि तपासानंतर प्रदीपचा मृतदेह काळा तलावात आढळून आला. त्यामुळे प्रदीपने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
प्रदीपच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याने टोकाचे पाऊल का उचलले असावे, त्याच्या आत्महत्येमागे कोणते कारण असावे, या प्रश्नांचा उलगडा करण्याचा महात्मा फुले चौक पोलीस प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात मृत प्रदीपचा भाऊ रमाकांत भोईर याने दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
