फसवणुकीचा नवा फॉर्म्युला
घटना अशी की गेल्या महिन्यात रामानी यांना व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःची नावे रिया शर्मा, प्रदीप जैस्वाल आणि विश्वास पाटील अशी सांगितली. त्या टोळक्याने व्हॉट्सअॅपवर पोलिसांचा स्टेटस ठेवला होता, ज्यामुळे ते खरे अधिकारी असल्याचा विश्वास त्यांना निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी बनावट पोलिस ओळखपत्रे, अधिकृत कागदपत्रे आणि सरकारी शिक्के असलेली फाईल पाठवून स्वतःला पोलिस, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी, रिझर्व्ह बँक आणि ईडीचे प्रतिनिधी असल्याचे भासवले.
advertisement
या कागदपत्रांमध्ये बनावट नोटीस, समन्स आणि चौकशी आदेश यांचा समावेश होता. सर्व कागदपत्रे पाहून रामानी घाबरल्या. आरोपींनी सांगितले की त्यांच्या नावावर गंभीर गुन्ह्याची शंका आहे आणि त्यांना कधीही डिजिटल अटक होऊ शकते. या भीतीचा फायदा घेत त्यांनी रामानी यांना व्हेरिफिकेशनच्या नावाखाली आर्थिक माहिती मागितली.
पुढील काही दिवस आरोपींनी वारंवार कॉल करून त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांतून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. विश्वास बसावा म्हणून ते प्रत्येकवेळी नवीन बनावट नोटीस किंवा सरकारी पत्र पाठवत होते. या दडपणाखाली रामानी यांनी एकूण 60 लाख 20 हजार रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा केले.
काही दिवसांनी कोणतीही सरकारी प्रक्रिया न सुरू झाल्याने आणि संपर्क क्रमांकही बंद आढळल्याने त्यांना फसवणुकीची जाणीव झाली. तत्काळ त्या उल्हासनगर पोलिस ठाण्यात पोहोचल्या आणि संपूर्ण घटना नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
