नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव आकाश सिंग असे असून तो नवी मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. दरम्यान शनिवारी रात्री आकाश आपल्या काही मित्रांसोबत मालवण किनारा हॉटेलमध्ये जेवणासाठी आला होता. त्यानंतर तो जेवण झाल्यानंतर रात्री उशिरा हॉटेलच्या बाहेर पडत होता त्यात तिथेच एका अज्ञात तरुणाला त्याचा धक्का लागला. या छोट्याशा कारणांवरुन दोघांमध्ये वाद वाढत गेला आणि काही क्षणांतच तो रागाच्या भरात मारामारीपर्यंत पोहोचला.
advertisement
वाद वाढत असताना त्या तरुणाने आपल्या दोन साथीदारांना बोलावून घेतले. तिघांनी मिळून आकाशवर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून आकाशला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पाहता पाहता हॉटेलसमोरील परिसरात गोंधळ उडाला. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले.
घटनास्थळी पोहोचलेल्या मानपाडा पोलिसांनी आकाशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्या गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून तपासाची चक्रं वेगाने फिरवली आहेत.
प्राथमिक तपासात, आरोपी परिसरातीलच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत. केवळ किरकोळ धक्का लागल्याने एखाद्याचा जीव घेण्याइतका राग वाढणे हे पाहून सर्वसामान्य नागरिक हादरले आहेत. या घटनेमुळे डोंबिवलीतील शांतता भंगली असून नागरिकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
सध्या पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यासाठी हॉटेलमधील ग्राहक, कर्मचारी आणि आसपासच्या लोकांची चौकशी सुरू केली आहे. पुढील तपास मानपाडा पोलीस करत असून आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्घृण हत्येमुळे डोंबिवली परिसरात संताप पसरला आहे. केवळ क्षुल्लक कारणावरून एका तरुणाचा बळी गेल्याने नागरिकांकडून पोलिस प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
