कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी यासाठी एएमआरडीएकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला गती मिळाली आहे. यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले आहेत.
advertisement
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले आहेत. मतदारसंघातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, कल्याण शिळफाटा रस्ता, पलावा उड्डाणपूल, मुंब्रा वाय जंक्शन, कल्याण रिंग रोड, मोठागाव माणकोली उड्डाणपूल यांसारख्या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे मतदारसंघात वाहतुकीला वेग मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौकापर्यंत उर्वरित उन्नत मार्ग बांधणे आणि १५ मी. रुंद रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने ३६ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे.
स्थानिक भागातील वाहतूक जलदगतीने होणार
ठाकुर्ली लेव्हल क्रॉसिंग ते मानपाडा चौकादरम्यानच्या उन्नत रस्त्याचे बांधकाम आणि १५ मीटर रुंदीच्या जोडरस्त्यांचा विकास या प्रकल्पामध्ये करण्यात येणार आहे. परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीवरील ताण, प्रवासातील विलंब, तसेच अपघाताचा धोका कमी करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ठाकुर्ली, मानपाडा, डोंबिवली परिसरातील नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि जलद वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार असून, स्थानिक भागातील वाहतूक जलदगतीने होण्यास हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे
या प्रकल्पाच्या टप्प्यात अनेक घरे येत असून त्यांचे तोडकाम करण्यात येणार आहे. तर यातील बाधित कुटुंबांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्यात येणार आहे. या सर्व कुटुंबियांना बीएसयुपी योजनेतील घरे देण्यात येणार आहेत. याबाबत प्रक्रिया देखील जलदगतीने राबविण्यात येत आहे.
कसा आहे प्रकल्प?
• उन्नत मार्ग - लांबी -360 मी, रुंदी - 7.5 मी.
• रस्ता - लांबी -1050 मी, रुंदी - 7.5/8.5 मी
प्रकल्पाचे फायदे
• वाहतुकीची क्षमता वाढेल.
• प्रवासाचा वेळ कमी होईल आणि विलंब टळेल
