खडवली नाका येथे सुरू होणार्या पुलाच्या पाडकामामुळे वाहतूक सुरळीत राहावी आणि कोंडी होऊ नये, यासाठी काही महत्त्वाच्या मार्गांवर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे लिंक रोडवरून विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक आणि श्रीराम चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना आनंद दिघे चौक तसेच स्मशानभूमी चौकात प्रवेश करता येणार नाही. या वाहनांना आनंद दिघे उड्डाणपूल आणि सम्राट चौक मार्गे पर्यायी मार्गाने वळवले जाणार आहे. श्रीराम चौक आणि विठ्ठल वाडी रेल्वे स्थानकाच्या बाजूकडून खडवली नाका किंवा चाकण नाक्याकडे जाणाऱ्या वाहनांना श्रीराम चौकात थांबून किंवा प्रवेश दिला जाणार नाही.
advertisement
त्या वाहनांसाठी नागरिकांना वाहतूक शाखेने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, शांतीनगर (उल्हासनगर) आणि सम्राट चौक असा पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे. हलके वाहन आणि कल्याण पूर्वेतील रहिवाशांना कोळशेवाडी पोलीस स्टेशन, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन पूर्वेकडे किंवा तेथून प्रवास करणार्यांना अंतर्गत रस्त्यांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोळशेवाडी पोलीस ठाणे परिसर, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाचा पूर्व भाग आणि काटेमानवली पुलाखालून हनुमान नगर, चिंचपाडा रोड आणि शंभर फूट रोड या मार्गांचा उपयोग करता येणार आहे.
श्रीराम चौकातून कल्याण पूर्वेकडे येणाऱ्या वाहनांसाठी महिला उद्योग केंद्राजवळून विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या बाजूने किंवा खडवलीकडे जाणारा मार्ग खुला ठेवण्यात येणार आहे. या संपूर्ण बदलांबाबत नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी केडीएमसी आणि ठाणे शहर पोलीस प्रशासनाकडून दिशा दर्शक फलक सुद्धा लावण्यात येणार आहेत. हे वाहतूक नियम 22 जानेवारी रोजी रात्री 12:01 वाजल्यापासून लागू होणार आहेत. मात्र, पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉरसह इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.
