एका चुकीच्या पावलामुळे युवकाने जीव गमावला
रोहित गुप्ता जो टिटवाळा येथील रहिवासी होता तो आणि त्याचा मित्र अजय पंडम 1 जानेवारीला चंदेरी गडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. दोघांनी गड पूर्ण चढला पण परतीच्या मार्गावर अचानक रोहितचा पाय घसरला. त्याचा पाय घसरत सुमारे 500 ते 600 फूट खोल दरीत तो कोसळला. अपघात इतका भयंकर होता की घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच बदलापूर आणि लोणावळा येथील रेस्क्यू टीम, स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले. दाट जंगल, खोल दरी आणि अवघड परिस्थितीमुळे शोधकार्य खूप कठीण झाले. 24 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रोहितचा मृतदेह दरीत आढळला. रेस्क्यू टीमने सुरक्षेचे सर्व उपाय करून त्याचा मृतदेह गडाखालील सुरक्षित ठिकाणी आणला.
ही मोहीम अत्यंत धोकादायक आणि आव्हानात्मक होती. स्थानिक लोकांनी आणि ट्रेकर्सनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. या घटनेतून ट्रेकिंग करताना सुरक्षा आणि काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
