समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी महापालिका निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या मुलाखती सुरू असताना पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या गोंधळात शहाड शाखा प्रमुख निशिकांत ढोणे यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीला प्रत्युत्तर देत भागवत बैसाने यांनाही मारहाण झाल्याची माहिती आहे. दोघेही जखमी झाले असून घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
घटनेनंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी तातडीने रुग्णालयात पाठवले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याबाहेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून काही काळ परिसरात तणाव कायम होता.
निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील अंतर्गत मतभेद आणि गटबाजी उघडपणे समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. निवडणुकीच्या तयारीऐवजी अशा प्रकारच्या घटनांमुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याची प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून तक्रारीनंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
