नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर महानगरपालिकेने शहराच्या स्वच्छतेचे काम कोणार्क इन्व्हायरो कंपनीला दिले आहे. या कंपनीत महादू जगताप हे सफाई कामगार म्हणून काम करत होते. दरम्यान सोमवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास ते कॅम्प नंबर 3 येथे कर्तव्यावर होते.
कॅम्प नंबर 3 परिसरातील माजी नगरसेविका इंदिरा उदासी यांच्या घरासमोर कचरा का उचलला नाही, असा सवाल दुर्गेश गुप्ता याने दारूच्या नशेत महादू जगताप यांना केला. त्यावर जगताप यांनी शांतपणे उत्तर देत, ''माझे काम फक्त साफसफाई करून कचरा एका बाजूला ठेवण्याचे आहे. तो कचरा उचलण्याची जबाबदारी माझी नाही.'' असे सांगितले.
advertisement
या उत्तरामुळे संतापलेल्या दुर्गेश गुप्ताने अचानक चाकू काढून महादू जगताप यांच्यावर हल्ला केला. त्याने सलग अनेक वार करत जगताप यांना गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
उपचारापूर्वी कामगाराचा मृत्यू
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महादू जगताप यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तपास करत आरोपी दुर्गेश गुप्ता याला अटक केली आहे.
एका हत्येने उद्ध्वस्त झालं हसतं-खेळतं कुटुंब
महादू जगताप हे पत्नी पूर्वी आणि दोन लहान मुलांसह शहाड गावठाण परिसरात राहत होते. पतीच्या हत्येची माहिती मिळताच पूर्वी यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. मात्र पतीचा मृतदेह पाहून त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. घरी परतल्यानंतर या धक्क्यातून सावरता न आल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे दोन लहान मुले आई-वडिलांविना राहिली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
