तलवारीच्या सपासप वारांनी उल्हासनगर हादरलं
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित जगदाळे असे जखमी तरुणाचे नाव असून तो मित्रांसोबत सुभाष टेकडी परिसरात असलेल्या मैदानावर सुरू असलेला क्रिकेट सामना पाहत होता. यावेळी सुमित सदावर्ते याच्याशी त्याचा किरकोळ वाद झाला. सुरुवातीला हा वाद शाब्दिक होता. मात्र काही वेळातच वाद विकोपाला गेला.
तरुणाची प्रकृती गंभीर
वादानंतर सुमित सदावर्ते याने आपल्या साथीदारांना मैदानात बोलावले. काही वेळातच टोळक्याने रोहितवर अचानक तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तातडीने रोहितला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासात किरकोळ वादातूनच हा हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
