नाशिक येथी हृदयरोग तज्ज्ञ, डॉ. हिरालाल पवार, यांनी त्यांच्या फेसबुक अकांऊटवर याबद्दल सविस्तरपणे माहिती दिली आहे. डॉक्टरांच्यामते, आपल्याला ॲसिडिटी आणि हार्ट अटॅक यातील फरक वेळीच ओळखाता यायला हवा. कारण बऱ्याच वेळेला या दोन्ही आजारांची लक्षणे सारखी दिसतात आणि आपला चुकीचा अंदाज घेणे जीवघेणा ठरू शकते. छातीत होणारी कोणतीही वेदना ही ॲसिडिटी आहे, असे समजून दुर्लक्ष करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
advertisement
ॲसिडिटीची लक्षणे
ॲसिडिटीची तीन प्रमुख लक्षणे दिसतात. त्यामध्ये, छातीत जळजळ होणे, विशेषतः जेवणानंतर किंवा उपाशी पोटी, हे मुख्य आहे. त्यानंतर आंबट ढेकर, तोंडात आंबटपणा आणि आवाजासह ढेकर येणे, ही ॲसिडिटीची क्लासिकल लक्षणे आहेत. त्यासोबतच वरच्या पोटात दुखणे, पोट फुगणे ही लक्षणेदेखील आढळतात. ॲसिडिटीची वेदना बहुतेक वेळा पाणी प्यायल्यानंतर, ॲन्टासिड गोळी घेतल्यानंतर किंवा ढेकर पास झाल्यानंतर लगेच नाहीशी होते.
हार्ट अटॅकची लक्षणे
हार्ट अटॅकच्या लक्षणांमध्ये छातीच्या मध्यभागी तीव्र दाब, जडपणा किंवा छाती चिरडल्यासारखी वेदना होते. थोडक्यात छातीवर खूप प्रेशर आल्यासारखे वाटते. ही वेदना हात, मान, खांदा किंवा जबड्याकडे पसरू शकते. पाच ते दहा मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकणारी छातीची वेदना आणि चालताना किंवा जिने चढताना वाढणारी वेदना ही हृदयविकाराचा त्रास असू शकते. कधीकधी घाम येणे, उलटी होणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे, ही पण हार्ट अटॅकची मुख्य लक्षणे असू शकतात.
दोन्हीतील फरक ओळखण्यासाठी महत्त्वाचा सिग्नल
सगळ्यात महत्त्वाचा सिग्नल म्हणजे, ॲन्टासिड घेतल्यानंतर हार्ट अटॅकच्या लक्षणांमध्ये आराम मिळत नाही. ॲसिडिटीमध्ये जळजळ होते, तर हार्ट अटॅकमध्ये दाब, दडपण आणि घुसमट होते. हा खूप महत्त्वाचा फरक आहे.
कार्डियाक इमर्जन्सी कधी समजावी?
कधी कधी काही लोकांमध्ये अटॅकच्या लक्षणांमध्ये ॲसिडिटी झाल्यासारखी फिलिंग असते, ज्यामुळे या दोन लक्षणांमध्ये खूप गोंधळ उडतो आणि आपला वेळ वाया जातो. यामुळे जीव धोक्यात येऊ शकतो.
लक्षात ठेवा, जर छातीतली अस्वस्थता दहा मिनिटांपेक्षा जास्त टिकली आणि त्यासोबत श्वास घ्यायला त्रास, खूप घाम किंवा डावा हात दुखत असेल, तर ही ॲसिडिटी नसून कार्डियाक इमर्जन्सी असू शकते.
वेळेत उपचार घेणे आवश्यक
अशा वेळी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, आपण त्वरित हॉस्पिटलमध्ये जाऊन ईसीजी करून घेणे आवश्यक आहे. कारण ईसीजी केला तर निदान लवकर होते आणि वेळेत उपचार सुरू करता येतात. त्यामुळे छातीतील वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. ॲसिडिटी आणि हार्ट अटॅकमधील फरक समजून घ्या आणि वेळेत उपचार घ्या.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
