पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल (Lokmanya Hospitals, Pune) येथील डॉ. प्रशांत पोतदार यांनी चहा पिण्याच्या योग्य पद्धतीबद्दल आणि त्यामागील विज्ञानाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
जेवणानंतर लगेच चहा पिणे टाळावे का?
डॉ. प्रशांत पोतदार यांच्या मते, जेवणाच्या अगदी आधी किंवा जेवणानंतर लगेच चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामागे एक शास्त्रीय कारण आहे. चहामध्ये कॅफिन (Caffeine) आणि टॅनिन्स (Tannins) नावाचे घटक असतात. हे घटक अन्नातील पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा निर्माण करतात.
advertisement
लोह आणि कॅल्शियमवर परिणाम
जर तुम्ही जेवणानंतर लगेच चहा पिला, तर शरीरातील लोह (Iron) आणि कॅल्शियमचे शोषण लक्षणीयरीत्या कमी होते. यामुळे भविष्यात ॲनिमिया किंवा हाडांच्या समस्या उद्भवू शकतात.
पचनात अडथळा
चहातील टॅनिन्स अन्नातील प्रथिनांशी (Proteins) संयोग पावतात, ज्यामुळे पचन प्रक्रिया मंदावते.
चहा पिण्याची योग्य वेळ आणि प्रमाण काय?
जर तुम्हाला चहाचे शौकीन असाल, तर डॉ. पोतदार यांनी काही महत्त्वाचे नियम सुचवले आहेत:
1. वेळेचे अंतर
चहा नेहमी जेवणाच्या किमान 2 तास आधी किंवा जेवणानंतर 2 ते 3 तासांनी घ्यावा. यामुळे अन्नातील पोषक तत्वे शरीराला मिळण्यास पुरेसा वेळ मिळतो.
2. किती वेळा प्यावा?
दिवसभरातून 2 वेळा चहा घेणे (सकाळी आणि संध्याकाळी) साधारणपणे सुरक्षित मानले जाते.
3. साखरेचे गणित
जास्त चहा घेतल्याने शरीरात विनाकारण कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण वाढते. जर तुमची ब्लड शुगर नियंत्रणात असेल (उपाशीपोटी 100 आणि जेवणानंतर 100-140 दरम्यान), तर दिवसातून 2 ते 2.5 कप चहा घेणं चालू शकतं.
डॉ. प्रशांत पोतदार यांचा सल्ला
"आरोग्यासाठी योग्य सवयी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चहाची सवय वाईट नाही, पण तो कधी आणि किती प्रमाणात घेतला जातो, यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. अति चहामुळे अनावश्यक कॅलरीज वाढतात, ज्यामुळे वजनावर आणि रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो."
रिकाम्या पोटी (Bed Tea) चहा घेणे टाळा, कारण यामुळे ॲसिडिटी वाढू शकते. चहामध्ये साखरेचे प्रमाण कमीत कमी ठेवा किंवा गुळाचा वापर करा (परंतु दुधाच्या चहात गूळ जपून वापरावा). शक्य असल्यास हर्बल टी किंवा ग्रीन टीला प्राधान्य द्या.
चहा पिणे हा एक आनंद असला तरी, डॉक्टरांनी सांगितलेल्या या साध्या नियमांचे पालन केल्यास तुम्ही चहाचा आस्वादही घेऊ शकता आणि तुमचे आरोग्यही जपू शकता.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहचवण्याचा आहे.)
