मूत्रपिंडं शरीरातील युरिया किंवा अतिरिक्त पाणी यासारखे अशुद्ध घटक काढून टाकतातच, पण रक्त स्वच्छ करण्यासाठी, शरीरात पाणी, सोडियम-पोटॅशियम सारख्या खनिजांचं संतुलन राखण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी देखील मदत करतात. इतकं महत्त्वाचं काम करणारी किडनी कमकुवत झाली तर त्याचा शरीरावर धोकादायक परिणाम होतो. म्हणूनच किडन्या निरोगी ठेवणं खूप महत्वाचं आहे.
advertisement
Pimples : आयुर्वेदात आहेत मुरुमांवर जालीम उपाय, चेहरा दिसेल स्वच्छ, चमकदार
जगभरातील सुमारे 85 कोटी जण किडनीच्या आजारांनी ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत, योग्य आहार हा किडनी निरोगी ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. किडनीच्या रुग्णांसाठी फायदेशीर पदार्थ पाहूयात.
किडनीचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय खावं -
फुलकोबी - फुलकोबीत पोटॅशियम आणि फॉस्फरसचं प्रमाण कमी असतं, पण यात व्हिटॅमिन सी, फोलेट आणि फायबर असतं.
लाल शिमला मिरची - ही रंगीत भाजी चविष्ट आहे आणि यात पोटॅशियम कमी आहे, अ, क आणि B6 जीवनसत्त्वं आहेत. ऑम्लेटमधे, सॅलडमध्ये घालून ही भाजी आहारात खाऊ शकता.
बेरी - विविध प्रकारच्या बेरीमधे भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते जळजळ कमी करण्यास मदत करतात. क्रॅनबेरी मूत्रमार्गाच्या संसर्गास देखील प्रतिबंधित करतात. दही किंवा ओट्समध्ये, पाण्यात घालून किंवा नुसत्या बेरीही खाता येतात.
अंड्याचा पांढरा भाग - फॉस्फरस कमी असल्यानं हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे मूत्रपिंडांवर ताण पडत नाही. अंड्याच्या पांढऱ्या भागाचं ऑम्लेट हा त्यासाठीचा चांगला पर्याय आहे.
ऑलिव्ह ऑइल - यात निरोगी चरबी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हृदय आणि मूत्रपिंड दोन्हीसाठी ऑलिव्ह ऑइल चांगलं आहे. सॅलड, सूप, भाज्यांत याचा वापर करता येईल.
लसूण आणि कांदा - लसूण - कांद्यानं चव वाढते. रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत होते.
अरुगुला आणि कमी पोटॅशियम असलेल्या पालेभाज्या - अरुगुलासारख्या पालेभाज्या मूत्रपिंडांसाठी सुरक्षित असतात. त्यात व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.
मॅकाडामिया नट्स - इतर सुक्या मेव्यांपेक्षा यात पोटॅशियम आणि फॉस्फरसचं प्रमाण कमी असतं. निरोगी चरबी आणि खनिजांनी समृद्ध असतं.
मूत्रपिंडाच्या रुग्णांनी सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरसचं प्रमाण कायम नियंत्रित ठेवावं. वर दिलेल्या पदार्थांत या खनिजांचं प्रमाण कमी असतं पण यातून आवश्यक पोषण, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात.
मूत्रपिंडाच्या रुग्णांनी कोणते पदार्थ टाळावेत ?
• जास्त मीठ असलेले पदार्थ: लोणचं, चिप्स, प्रक्रिया केलेलं मांस
• पोटॅशियम जास्त असलेलं पदार्थ : केळी, बटाटे, टोमॅटो, पालक
• फॉस्फरस जास्त असलेले पदार्थ : दुग्धजन्य पदार्थ, कोला, चॉकलेट
• लाल मांस आणि ऑर्गन मीट
पाण्याचं महत्त्व -
किडनीच्या रुग्णांनी संतुलित प्रमाणात पाणी प्यावं. जास्त पाण्यामुळे किडनीवर ताण पडतो आणि कमी पाण्यामुळे शरीरात विषारी पदार्थ वाढतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पाणी प्या.