जास्त प्रमाणात चहा - कॉफी पिणं हे आरोग्यासाठी जितकं धोक्याचं आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त धोक्याचं आहे ते पेपरकप मधून चहा - कॉफी पिणं.
काही वर्षापूर्वीपर्यत चहा - कॉफी पिण्यासाठी अनेक जण प्लॅस्टिकचे कप वापरत होते. मात्र प्लॅस्टिकच्या दुष्परिणांमुळे अनेकांनी कागदी कपातून चहा - कॉफी प्यायला सुरूवात केली. मात्र IIT खरगपूरच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासातून असं आढळून आलंय की, कागदी कप हे सुद्धा आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकतात. कारण हे कप जरी जाड कागदापासून बनलेले असले तरीही त्यात, चहा - कॉफी, गरम पाणी किंवा एखादं गरम सूप टाकल्यानंतर ते कप फाटू नयेत यासाठी किंवा कपात चहा - कॉफी किंवा गरम वस्तू दीर्घकाळ राहावी यासाठी कागदाच्या कपांना आतल्या बाजूला प्लास्टिक किंवा मेणाचा पातळ थर लावला जातो. जेव्हा आपण त्यात गरम पदार्थ ओततो तेव्हा हा थर वितळू लागतो. यामुळे प्लास्टिकचे छोटे कण आणि हानिकारक रसायने चहा - कॉफीत मिसळतात.
advertisement
काय सागतं संशोधन?
एका अभ्यासानुसार, जर तुम्ही पेपर कपमध्ये दिवसातून तीन कप चहा किंवा कॉफी पित असाल तर हजारो मायक्रोप्लास्टिक कण तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात. यामुळे तुमच्या पचनसंस्थेला हानी पोहोचू शकते. इतकचं काय तर या मायक्रोप्लास्टिक कणांचा शरीराच्या इतर अवयवांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्लास्टिकच्या कपातून चहा - कॉफी पिणं टाळा.
हे सुद्धा वाचा : Disposable Cups: तुम्हीही डिस्पोजेबल कप मध्ये चहा पिता का? मग हे एकदा वाचाच!
पेपर कपात चहा - कॉफी पिण्याचे धोके
वैज्ञानिक संशोधनात असं दिसून आलं आहे की पेपर कपमधलं मायक्रोप्लास्टिक्स आणि रसायनांचे कण दीर्घकाळ शरीरात साचून कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. पेपर कपच्या कोटिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे हार्मोनल असंतुलनाचा त्रास होऊ शकताय. ज्याचा थेट नकारात्मक परिणाम थायरॉईड आणि प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो. पेपर कप हे पर्यावरणासाठी सुद्धा हानिकारक आहेत. जरी ते कागदापासून बनवलेले असले तरीही प्लास्टिकच्या बारीक, पातळ आवरणामुळे त्यांचा पुर्नवापर करणं कठीण होतं.
सिरॅमिकचे कप किंवा मग वापरा
पेपर कपात चहा - कॉफी पिण्यापेक्षा तुम्ही काचेच्या कपांचा किंवा सिरॅमिकच्या मगचा वापर करा. बाजारात बायोडिग्रेडेबल कप सुद्धा उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून, तुम्ही स्वत:च्या आरोग्याचं आणि पर्यावरणाचं रक्षण करू शकता. मात्र याही पेक्षा जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा काचेच्या ग्लासमधून, सिरॅमिकच्या कपातून किंवा मगमधून चहा - कॉफी, गरम पाणी किंवा सूप प्या. म्हणजे तुमच्या आरोग्याला कोणताही धोका उरणार नाही.