नाश्त्यासाठी स्वादिष्ट, आरोग्यदायी आणि बनवायला सोपा अशा एका पर्यायाविषयी. केळी-ओट्सचे पॅनकेक्स ही पाककृती केवळ नाश्त्यासाठीच नव्हे, तर दुपारच्या भुकेसाठीही एक उत्तम पर्याय आहे. केळी-ओट्स पॅनकेक कसे बनवायचे पाहूया.
advertisement
साधारण दोघांसाठी लागणारं साहित्य -
एक कप ओट्स रोल्ड किंवा इन्स्टंट
दोन मध्यम आकाराची पिकलेली केळी
अर्धा कप दूध किंवा बदामाचे दूध
एक अंडं, शाकाहारी अंड्याऐवजी दही वापरू शकतात.
अर्धा चमचा बेकिंग पावडर
चिमूटभर दालचिनी पावडर
व्हॅनिला इसेन्सचे दोन-तीन थेंब
मध किंवा मेपल सिरप
सर्वात आधी, ओट्स मिक्सरममधे घालून बारीक दळून घ्या. त्याची पावडर झाली की एका भांड्यात काढून घ्या.
दुसऱ्या भांड्यात केळी सोलून काटा चमच्यानं चांगली कुस्करून घ्या. त्यात अंडं किंवा दोन मोठे चमचे दही, दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत फेटून घ्या.
ओट्स पावडरमधे बेकिंग पावडर आणि दालचिनी मिसळा. हळूहळू केळ्याचं आणि दुधाचं मिश्रण घाला आणि मिसळत रहा. पीठ खूप पातळ होणार नाही याची काळजी घ्या, त्याचा घट्टपणा इडलीच्या पिठासारखा असावा. ते पाच मिनिटं तसंच ठेवा जेणेकरून ओट्स ओलावा शोषून घेतील.
मध्यम आचेवर नॉन-स्टिक पॅन गरम करा त्यात थोडं बटर लावा. मोठ्या चमच्यानं पॅनवर पीठ पसरवा. ते खूप पातळ होणार नाही याची काळजी घ्या. पॅनकेकच्या वरच्या बाजूला लहान बुडबुडे दिसतील, तेव्हा तो काळजीपूर्वक पलटा. दुसऱ्या बाजूने सोनेरी तपकिरी होईपर्यंत एक-दोन मिनिटं शिजवा.
केळी-ओट्सचे पॅनकेक्स तयार आहेत. पॅनकेक्स सर्व्ह करताना, त्यावर थोडा मध किंवा मेपल सिरप घाला. पॅनकेक्स अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही त्यावर केळीचे काप आणि ब्लूबेरीही वापरु शकता.
