उन्हाळ्यात, त्वचा ताजीतवानी आणि निरोगी ठेवण्यासाठी थंड, पोषणयुक्त आणि मॉइश्चरायझ करणं आवश्यक आहे. यासाठी काही घरगुती फेस पॅक वापरू शकता.
उन्हाळ्यासाठी घरगुती फेस पॅक
टरबूज आणि मधाचा फेस पॅक - टरबुजामुळे त्वचा हायड्रेट होते आणि मधामुळे त्वचेचं पोषण होतं. म्हणून, टरबुजाच्या रसात थोडा मध मिसळा आणि ते तुमच्या चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमची त्वचा मॉइश्चरायझ होईल आणि चेहऱ्यावर चमक येईल.
advertisement
पपई आणि कोरफडीचा फेस पॅक - पपई मृत त्वचा काढून टाकून त्वचेला स्वच्छ करते, तर कोरफडीचा वापर थंडावा निर्माण करतो. दोन्ही मिसळा, लावा आणि पंधरा मिनिटांनी स्वच्छ धुवा. उन्हाळ्यातही तुमची त्वचा थंड, स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी आठवड्यातून दोन-तीन वेळा हे फेस पॅक वापरु शकता.
चंदन आणि गुलाबपाणी फेस पॅक - चंदन त्वचेला थंड करतं आणि गुलाबपाणी त्वचेला हायड्रेट ठेवतं. एक चमचा चंदन पावडर गुलाबपाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि पंधरा मिनिटं चेहऱ्यावर लावा. हा पॅक जळजळ आणि पुरळांपासून आराम देतो.
काकडी आणि दहीचा फेस पॅक - काकडी त्वचेला थंड करते आणि दही ओलावा टिकवून ठेवते. काकडीचा रस काढून त्यात एक चमचा दह्याचा रस मिसळा. तो चेहऱ्याला लावा आणि वीस मिनिटांनी साध्या पाण्यानं धुवा. यामुळे त्वचा ताजी आणि टॅनमुक्त होते.
कोरफड आणि पुदिना फेस पॅक - कोरफडीमुळे उष्णतेपासून आराम मिळतो आणि पुदिन्यानं थंडावा मिळतो. पुदिन्याची पानं बारीक करा आणि कोरफड गरामधे मिसळा. चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा. यामुळे मुरुम आणि जळजळ दूर होते.
बेसन आणि टोमॅटोचा फेस पॅक - बेसनामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते आणि टोमॅटोमुळे टॅनिंग काढून टाकता येतं. टोमॅटोच्या रसात एक चमचा बेसन मिसळा आणि लावा. ते वाळल्यानंतर हलक्या हातानं घासून साध्या पाण्यानं धुवा.
मुल्तानी माती आणि काकडीचा फेस पॅक - उन्हाळ्यासाठी मुलतानी माती सर्वोत्तम आहे. काकडीचा रस त्यात मिसळून तेलकट त्वचेवर लावल्यानं त्वचेला थंडावा मिळतो आणि उष्णतेमुळे येणारं पुरळंही कमी होतं.
