पैठणी साडी ही हॅण्डलूमवर तयार केली जाते. ती दोन्ही बाजूने सारखी दिसावी आणि हर सेंटीमीटर कलर बदलू शकतो आणि ते दोन्हीकडून सारखेच दिसते. या साडीला पैठणी हे नाव पैठण नगरीवरूनच मिळाले आहे. इथे तिचा जन्म झाला आणि इथेच ती हजारो वर्षांपासून विणली जात आहे. पैठणी हे केवळ एका साडीचे नाव नसून ती पैठण शहराची ओळख बनली आहे. तिचा वारसा आणि तिच्या समृद्ध इतिहासाचे प्रतीक मानले जात आहे
advertisement
कधी काळी सोन्यासारखी होती किंमत
पैठणी साडीची किंमत कधी काळी सोणे आणि चांदीच्या किमती एवढी होती. रोमन लोकांमध्ये पैठणीच्या कापडाची प्रचंड क्रेझ होती. त्याकाळी पैठणीचं कापड भारतातून एक्सपोर्ट होत होतं आणि रोमन लोक अनेक दिवस या कापडाची बंदरावर वाट पाहत असायचे. रोमन लोक सोन्यासोबतच पर्फ्युम आणि रोमन वाईनच्या बदल्यात पैठणीचा व्यवहार करत होते.
एक साडी विणण्यासाठी लागतात महिने
पैठणी साडीचा उगम हा पैठणध्येच झाला. सुरुवातीला ही साडी शुद्ध सोने आणि जरीकामकरून विणली जायची. ही साडी पूर्णपणे हाताने विणली जाते. त्यावरचे डिझाईन देखील हस्तकौशल्यच असते. यामुळे साडीला एक शाही आणि आकर्षक रूप प्राप्त होते. या साडीचे वजन दोन ते तीन किलो ग्राम देखील असते. मध्यम दर्जाची एक पैठणी साडी विणण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो, चांगला दर्जाची साडी विणण्यासाठी काही महिने आणि उच्च दर्जाची साडी विणण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी देखील लागतो.
महत्त्वाच्या समारंभाचे आकर्षण
अधुनिक काळात देखील या साडीची क्रेझ कायम आहे. देशभरातून पैठणी साडीला मागणी असते. या साडीचा दर्जा आणि त्याचे विणकाम यामुळे ती अतिशय प्रसिद्ध आहे. त्यामुळे कोणताही मोठा सण असो, उत्सव असो किंवा कौटुंबिक आणि व्यवसायीक कार्यक्रम असो. अनेक महिला पैठणी साडी नेसण्यास प्राधान्य देतात. महाराष्ट्रात लग्नासारख्या अतिशय महत्त्वाच्या समारंभात नवरी पैठणीलाच प्राधान्य देते. अनेक महत्त्वाच्या समारंभात पैठणी हे आकर्षण असते.
दोन पैठणी कधीच सारख्या नसतात
पैठणी साडी नऊवारी आणि सहावारी अशा दोन प्रकारात मिळते. या साडीचं सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे दोन पैठणी साडी कधीच सारख्या नसतात. प्रत्येक पैठणी ही वेगळी असते. प्रत्येक कलरचे वेगळे नाव असते, जसे की चॉकलेट ब्राऊन रंगाला कुसुंबी म्हणतात, तर काळ्या रंगाच्या पैठणीला कालीचंद्रकला म्हटले जाते. पैठणीवरील नक्षीकाम ही तिची खास ओळख आहे. हे नक्षीकाम पैठणसह संभाजीनगरमधील अजिंठा, वेरूळ या लेण्यांवरून प्रेरित आहे.
पैठणी साडीवरील नक्षीकामाचे वैशिष्ट्ये
पैठणीसाठी खास रेशीम वापरले जाते आणि त्यावर पारंपरिक मोराचे, पोपटाचे, कमळाचे किंवा इतर नैसर्गिक नक्षीकाम केले जाते. या नक्षीकामासाठी जरीचा वापर केला जातो. पैठणी साडीतील बांदगी मोर हे सर्वात जुने आणि सर्वात अवघड नक्षीकाम आहे. यानंतर आकृती डिझाईन येते, यात हिरे आणि रुबीसारखे नक्षीकाम केले जाते आणि ते अतिशिय सुंदर दिसते. त्यानंतर येते असावली वेल, यात सहा पाकळ्यांच्या फुलाचे नक्षीकाम केले जाते. पैठणीच्या काठांवर आणि पदरावर अरावली आणि सर्वात प्रतिष्ठित मोराचे नक्षीकाम असते. आणखी एक खास नक्षीकाम असते ज्यात अजिंठा लेणीवरून प्रेरित कमळाचे फूल रेखाटले जाते आणि त्यात मध्यभागी गौतम बुद्धांची प्रतिमा असते.
पैठणी साडीचे अनेक प्रकार
बांगडी मोर, पोपट, कमळ, घोडा, हंस, रुमझुम असे पैठणीचे अनेक प्रकार आहेत आणि ते तिची डिझाइन, नक्षीकाम आणि विणकामाच्या पद्धतीनुसार ओळखले जातात. पैठणीचा पदर अतिशय महत्त्वाचा असतो. संपूर्ण साडीत या भागावर जास्त लक्ष दिले जाते. पदरावर मोर किंवा इतर प्राण्यांची अतिशय बारीक आणि कलात्मक नक्षीकाम केले जाते. पदर आणि काठावरील डिझाईननुसार पैठणीचे अनेक प्रकार आहेत.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
