हिवाळ्यात आजारपण का वाढतात?
पांढऱ्या रक्तपेशी कमी होतात
थंड हवामानामुळे पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन कमी होते आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. डॉ एन आर शेट्टी म्हणतात की, ‘रक्तातल्या पांढऱ्या रक्तपेशी संक्रमणाचा सामना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. 2023 मध्ये द जर्नल ऑफ ऍलर्जी अँड क्लिनिकल इम्युनोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असं आढळून आलंय की, थंडीमुळे रोगप्रतिकारक शक्ती विशेषतः नाकातली प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे विषाणूंची वाढ होऊन संक्रमाणाचा धोका वाढतो, म्हणूनच हिवाळ्यात श्वसनाच्या तक्रारी वाढतात.
advertisement
गर्दीमुळे संक्रमण वाढतं
4 वर्षांपूर्वी आलेला कोरोना वायरस गर्दीमुळे कसा पसरतो हे आपल्याला कळलं होतं. त्यामुळे गर्दीची ठिकाणं हे संक्रमणाचे अड्डे असतात. हिवाळ्यात अनेकांना सुट्टी असते त्यांचे पिकनिकचे प्लॅनस् बनतात किंवा थंडीमुळे अनेक जण दारं खिडक्या बंद करून घरात राहणं पसंत करतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी आणि जिथे हवेची गुणवत्ता कमी आहे तिथे संक्रमणाचा धोका अधिक असतो.
कोरडी हवा
हिवाळ्यात हवा कोरडी असते. मग ती हवा घरातली असो की घराबाहेरची, या कोरड्या हवेमुळे नाक, घसा आणि श्वासनलिका कोरड्या पडतात. त्यामुळे जीवाणूंचा शिरकाव शरीरात सहज होऊ शकतो. त्यामुळे कोरडी हवासुद्धा संक्रमणाचं कारण ठरू शकते.
कमी सूर्यप्रकाश
हिवाळ्या सूर्यप्रकाश कमी असतो, त्यामुळे व्हिटॅमिन डीचं उत्पादन कमी होतं. तज्ञांच्या मतानुसार, व्हिटॅमीन डीच्या कमकरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन संक्रमाणाचा धोका वाढतो. 2019 क्युरेसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार हिवाळ्यापासून उन्हाळ्यापर्यंत जसजसा सूर्यप्रकाश वाढत जातो तसतशी व्हिटॅमिन डीच्या पातळी वाढत जाते.
तर आपण पाहिलं की हिवाळ्यात आजारी पडण्याची कारणं काय आहेत ती, आता जाणून घेऊयात हिवाळ्यात निरोगी राहण्याच्या काही टिप्स्.
हिवाळ्यात फिट कसं राहायचं?
पौष्टिक आहार
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी तुमचा आहार हा सकस आणि पौष्टिक असायला हवा. ज्यामुळे तुम्ही हिवाळ्यात स्वत:ला फिट ठेवू शकता. हिवाळ्याl पौष्टिक आहारासोबत व्हिटॅमिन सी जास्त असलेली फळं आणि भाज्या खाणं हे आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. हिवाळ्यात संत्री, पेरू, भोपळी मिरची, दूध, पनीर, अंडी, मासे, खाल्ल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून निघायला मदत होते. चियासीड्स, फ्लेक्ससीड्स आणि भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात. हळदीचं दूध, गरम आल्याचं पाणी किंवा हळद,आल्याचं सूप तुम्हाला आतून उबदार ठेवतील.
हायड्रेशन
हिवाळ्यात थंडीमुळे घाम येत जरी नसला तरीही वारंवार होणाऱ्या लघवीमुळे शरीरातलं पाणी कमी होतं. शिवाय श्वासोच्छवासामुळे आणि कोरड्या त्वचेमुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही हायड्रेट राहणं महत्त्वाचं असतं. गरम पाणी, हर्बल टी आणि सूप प्यायल्याने शरीर हायड्रेट राहायला मदत होईल. यामुळे तुमचा सांधेदुखीचा त्रास ही कमी होऊ शकतो असं डॉ. शेट्टी सांगतात.
उबदार कपडे घाला
सर्दी, हायपोथर्मिया आणि थंडी वाजून ताप येण्यासारखे आजार टाळण्यासाठी शरीर उबदार ठेवण्याची गरज असते. आवश्यकते प्रमाणे स्वेटर किंवा उबदार कपडे किंवा थर्मलवर तुमचे नेहमीचे कपडे घाला. टोप्या, स्कार्फ आणि हातमोजे घालून हातपायांवर थंडी वाजणार नाही याची काळजी घ्या.
नियमितपणे हात धुवा
हिवाळ्यात फ्लू सारखे संसर्गजन्य आजार डोकं वर काढतात. त्यामुळे अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी शरीराची स्वच्छता महत्त्वाची आहे. साबण आणि पाण्याने हात वारंवार धुतल्याने जंतू नाहीसे होऊन संक्रमणाचा धोका टळतो. जर थंडी फार असेल किंवा सतत हात धुणे शक्य नसेल तर हँड सॅनिटायझरचा वापर करा.
पुरेशी झोप घ्या
चांगली झोप ही तुम्हाला विविध आजारांना बळी पडण्यापासून रोखू शकते. ऐकून चकीत झाला ना पण हे खरं आहे. कारण तुम्ही पुरेशी झोप घेत असाल तर ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे हिवाळ्यात जर तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर तुमच्या झोपेचं वेळापत्रक पाळा. रात्री किमान 7 ते 8 तासांची झोप घ्या.
नियमित व्यायाम करा
व्यायाम हे शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करतात. नियमित व्यायाम केल्याने रक्ताभिसरण नीट होऊन सांधेदुखीचा त्रास टाळता येतो. तुम्ही ज्या भागात राहता तिथलं तापमान फारच कमी असेल तर घरातल्या घरात योगा आणि स्ट्रेचिंगसारखे व्यायाम करा. जर तुम्हाला गुलाबी थंडीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही घराबाहेर पडून चालणं किंवा सायकल चालवण्याचा व्यायाम करू शकता. हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या अहवालानुसार, हिवाळ्यातील व्यायाम अनेकांसाठी सुरक्षित जरी असला तरी, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे किंवा दमा असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करावा.
सतत हालचाल करत राहा
तुम्हाला हिवाळ्यात व्यायाम करणं शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या घरात शतपावली घाला किंवा शरीराची हालचाल कशी होईल याकडे लक्ष द्या. हालचाल केल्याने स्नायूंची ताकद वाढते. त्यामुळे हिवाळ्यातल्या सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.
गर्दीत जाणं टाळा टाळा
आधी सांगितल्याप्रमाणे अनेक जण नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी बाहेर गावी जात असतात. पर्यटनस्थळावर गर्दी झाल्यामुळे संक्रमणाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
योग्य पद्धतीने हिटरचा वापर करा
तुम्ही थंड हवेच्या प्रदेशात राहात असाल आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी हिटरचा वापर करत असाल तर तुम्हाला काळजी ही घ्यावीच लागणार आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या दाव्यानुसार,वारंवार हिटरचा वापर केल्याने हवा कोरडी होवून श्वसनमार्गाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आवश्यकेतेनुसार ह्युमिडिफायर वापरून हवेतली आर्द्रता टिकवण्याचा प्रयत्न करा. याशिवाय हिटरमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनोऑक्साइड वायूमुळे विषबाधा होण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी हिटर्स योग्य ठिकाणी ठेवा. जेणेकरून कार्बन मोनोऑक्साइड घराबाहेर पडेल आणि विषबाधेचा धोका टळेल.
निरोगी त्वचा
हिवाळ्यात आरोग्याप्रमाणे त्वचेची काळजी घेणंही क्रमप्राप्त आहे. त्यामुळे हिवाळ्यात सुद्धा मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रिन लोशनचा वापर करा. थंडी वाजते म्हणून जास्त गरम पाण्याने अंघोळ करू नका. यामुळे त्वचेचा नैसर्गिक मुलायमपणा आणि तजेलदारपणा नाहीसा होऊ शकतो.
नियमित तपासणी
जर तुम्हाला डायबिटीस किंवा हृदयविकार असतील तर हिवाळ्यात आरोग्याची तपासणी करणं क्रमप्राप्त ठरतं. यामुळे छुप्या आजारांचा धोका ओळखून ट्रिटमेंट करता येते. जेणेकरून आजारा गंभीर रूप धारण करणार नाही आणि तुमच्या जीवाला धोका उत्पन्न होणार नाही.
ऍलर्जीच्या कारणांचं उच्चाटन
आधी सांगितल्या प्रमाणे ज्यांना ऍलर्जीचा त्रास असतो त्यांच्यासाठी हिवाळा डोकेदुखीचा ठरतो. त्यामुळे ऍलर्जीला कारणीभूत ठरणारी धूळ, पाळीव प्राण्यांच्या डोक्यातील कोंडा यासह अन्य कारणं कशी कमी होतील याकडे लक्ष द्या. कार्पेट गरम पाण्याने स्वच्छ करा. प्राण्यांच्या केसात कोंडा होणार नाही यासाठी त्यांच्या स्वच्छतेकडे सुद्धा लक्ष द्या.
सूर्यप्रकाशात राहा
हिवाळ्यात कमी सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होऊ शकते. ज्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात जेव्हा जेव्हा तुम्हाला सूर्यप्रकाश घेण्याची संधी मिळेल तेव्हा तेव्हा सूर्यप्रकाश जा ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.
मद्यपान, गोड पदार्थ टाळा
तज्ज्ञांच्या मते “जास्त मद्यपान करणं, गोड पदार्थ खाण्याचा परिणाम रोगप्रतिकराक शक्तीवर होऊ शकतो. त्यामुळे थंडी घालवण्यासाठी मद्यपान, किंवा शरीराला ऊब मिळावी म्हणून गोड पदार्थ खाणं टाळा. त्याऐवजी, हर्बल टी, फळांचा ज्यूस, प्या.