कोल्हापूर : आता सगळेच पदार्थ सगळीकडे मिळतात, पण त्यातही युनिक काय आहे, हे पाहून ग्राहकांचा त्या डिशला प्रतिसाद मिळतो. खरंतर खाद्यपदार्थांच्या बाबतीत कोल्हापूरकरांचा काही नाद नाही, इथल्या तांबड्या-पांढऱ्या रस्श्यासमोर सर्व पदार्थ फिके पडतात. पण सध्या कोल्हापूरकरांची पसंती मिळतेय ती बिर्याणीला, ही बिर्याणी साधीसुधी नाही बरं का, मग त्यात एवढं काय वेगळेपण आहे, पाहूया.
advertisement
कोल्हापूरच्या ताराबाई पार्क परिसरात 'पिस्ता प्युअर व्हेज' नावाचं एक हॉटेल मागच्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालं. विनायक काटकर या हॉटेलचं व्यवस्थापन बघतात. हॉटेलचे मॅनेजर संतोष पंधारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या ग्राहकांना उत्तम प्रतीच्या काही युनिक डिश खायला मिळाव्या, या हेतूनं इथं युनिक डिश बनवायला सुरुवात झाली. त्यातलीच ही लोकप्रिय 'पोटली बिर्याणी'.
हेही वाचा : कोणी फळं खावी, कोणी फळांचा रस प्यावा? आहारतज्ज्ञांनी दिलं उत्तर
ही साधारण पंजाबची कल्पना. यात वेगवेगळ्या भाज्यांची शाकाहारी बिर्याणी एका रोटीच्या पिठात स्टफिंग करून बनवली जाते. या डिशच्या दिसण्यावरून आणि बनवण्याच्या पद्धतीवरून तिला पोटली बिर्याणी नाव देण्यात आलं. यात स्पेशल शाकाहारी बिर्याणी एका पिठाच्या गोळ्यात कचोरीतील सारणासारखी भरली जाते. बाहेरून एका पोटलीसारखा तो पिठाचा गोळा बांधून बिर्याणीसोबत त्याला पुरीसारखं तळलं जातं. तूप आणि केशरमिश्रित पाणी वापरल्यानं ही बिर्याणी एकदम चविष्ट होते. शिवाय पिठात बिर्याणी भरून ती तळल्यानं तिला एक वेगळीच चव मिळते, असं या हॉटलमधील शेफ योगेश केळसकर यांनी सांगितलं.
पोटली बिर्याणीसाठी लागणारं साहित्य :
सुरुवातीला एक प्लेट स्पेशल शाकाहारी बिर्याणी बनवून घ्यायची. त्यासाठी कांदा तुपात तळून, पुदिना, दही, बिर्याणी सुका मसाला, हळद, धने पावडर, जिरे पावडर, कसुरी मेथी वापरून बिर्याणीचा ओला मसाला बनवला जातो. तर, बिर्याणी बनवण्यासाठी फ्लॉवर, गाजर, फरसबी, हिरवे वाटाणे, पनीर वाफवून आणि काजू तळून घेतले जातात. तसंच यात दह्याचाही वापर होतो.
बिर्याणी बनवण्याची कृती :
- एका पॅनमध्ये थोडं तूप घेऊन पुदिना आणि बनवलेला बिर्याणी बेस परतवून घ्यायचा. त्यात दही, मीठ, मिरची पावडर, गरम मसाला, हळद, कसुरी मेथी घालून मिश्रण एकजीव होऊ द्यायचं.
- आता बिर्याणी बनवण्यासाठी ठेवलेल्या भाज्या घालून परतवावं .
- त्यात बिर्याणीसाठी खास तयार केलेला भात घालून वरून थोडं तूप, केशरमिश्रित पाणी, गुलाबपाणी आणि तळलेला कांदा घालावा.
- थोडा वेळ वाफ देऊन तयार झालेली मिक्स भाज्यांची शाकाहारी बिर्याणी ही पोटली बिर्याणी डिशसाठी वापरली जाते.
- बिर्याणीचं स्टफिंग तयार करण्यासाठी मैदा आणि गव्हाचं पीठ एकत्र करून त्याची एक जाड मोठी रोटी बनवून घ्यावी.
- तयार केलेली बिर्याणी या रोटीच्या मधोमध ठेवून मोदकाप्रमाणे तिला रोटीने बांधावं.
- तयार पोटली तेलात रंग बदलेपर्यंत मध्यम आचेवर काही मिनिटांसाठी तळावी.
पोटली बिर्याणी रायत्याबरोबर सर्व्ह केली जाते. आतली बिर्याणी खाल्ल्यानंतर बाहेरचं आवरण अर्ध तळलेलं असल्यामुळे ते खाऊ शकत नाही. मात्र त्याची पुरेपूर चव बिर्याणीत उतरते, जी कोल्हापूरकरांना प्रचंड आवडलीये. अनेक खवय्ये 300 रुपयांना मिळणारी ही नवी डिश ट्राय करण्यासाठी कोल्हापूरच्या पिस्ता प्युअर व्हेज हॉटेलमध्ये गर्दी करतात. 238/5, ताराबाई पार्क रोड, पलश हॉटेलजवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर - 416005 इथं हे हॉटेल आहे. आपण +919021272277 (विनायक काटकर) या क्रमांकावर फोन करून बिर्याणीची ऑर्डरही देऊ शकता.