जालना : आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारची खाद्य संस्कृती पाहायला मिळते. दक्षिण भारतात इडली डोसा, उत्तर भारतात छोले भटूरे तर मुंबईमध्ये वडापाव अतिशय प्रसिद्ध आहे. या खाद्यसंस्कृतीचे आदानप्रदान देखील मोठ्या प्रमाणावर होते. यामुळेच की काय मुंबईतील खाद्यपदार्थ इतर राज्यात तर इतर राज्यातील खाद्यपदार्थ संपूर्ण महाराष्ट्रात मिळतात. मुंबईतील वडापाव आता जालना शहरामध्ये देखील मिळायला लागला आहे. मुंबई शहरात बालपण गेलेल्या एका तरुणाने जालना शहर आल्यानंतर स्पेशल मुंबई वडापाव सेंटर सुरू केलं आहे. एका छोट्याशा गाड्यापासून सुरू केलेल्या व्यवसायातून हा तरुण आता दिवसाला 4 ते 5 हजारांची निव्वळ कमाई करतोय.
advertisement
अर्जुन दिवसे हे असं या होतकरू तरुणाचं नाव. अर्जुनचा संपूर्ण बालपण मुंबईतच गेलं. शिक्षण देखील त्याने तिथेच पूर्ण केलं. बी.कॉम. केल्यानंतर नोकरीच्या शोधात त्याने पीव्हीआर सिनेमामध्ये कामगार म्हणून काही दिवस काम केलं. यानंतर तो जालना शहरामध्ये स्थायिक झाला. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा यादृष्टीने त्याने वडापावचा छोटासा गाडा सत्कार कॉम्प्लेक्स इथे सुरू केला. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेला आणि त्याने आपल्या वडापावमध्ये कल्पकता देखील वाढवत नेली. छोट्या गाड्याचे रूपांतर मोठ्या दुकानात झालं.
दही नको ताक घ्या म्हणतात, पण खरंच त्याने वजन कमी होतं का? आहार तज्ज्ञांनी सांगितलं सत्य!
आता तो वडापाव सोबत ग्राहकांना सुखी लाल चटणी, हिरवी चटणी आणि लाल चटणी अशा तीन प्रकारच्या चटणी सर्व्ह करत आहे. त्याचबरोबर वडापाव सोबत गोबी आणि तळलेली पापडी देखील ग्राहकांच्या सेवेत देतोय. केवळ पंधरा रुपयांमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी मिळत असल्याने आणि वडापावची चव अत्यंत चांगली असल्याने ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला जवळपास एक हजार ते दीड हजार वडापावची विक्री या स्टॉलवर होते. 20 ते 25 हजारांची दिवसाची उलाढाल होऊन 4 ते 5 हजारांची निव्वळ कमाई होते. जालना शहरातील 4 ते 5 तरुणांना या माध्यमातून रोजगार देखील मिळत आहे.
आपल्या वडापाव सोबत तीन चटण्या आणि पापडी आपण ग्राहकांना देतो. वडापावची चव अतिशय उत्तम आहे आणि वडापावसाठी वापरलेलं सगळं साहित्य घरीच बनवलेलं आहे. दुपारी बारा वाजल्यापासून ग्राहकांची गर्दी सुरू होते ती रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असते. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असून दिवसाला एक ते दीड हजार वड्यांची विक्री होत असल्याचं, अर्जुन दिवसे याने लोकल 18 शी बोलताना सांगितलं.