मुंबई: सध्या उच्च शिक्षित तरुण हॉटेल आणि स्ट्रीट फूड व्यवसायाकडे वळत आहेत. मुंबईत दोन इंजिनियर मित्रांनी नोकरीची आशा सोडून स्वत:चा फूड ट्रक सुरू केला. घाटकोपरच्या एसव्हीडीडी शाळेच्या समोर मीत बोरा व रेनिल जोशी हे दोन मित्र मिळून फूड ट्रक चालवतात. पारंपरिक पदार्थ न विकता ते न्यूयॉर्क स्टाईल बॅगल्स प्रकार विकत आहेत. त्यांच्या या खास पदार्थाला मुंबईकरांची चांगली पसंती मिळत असून फूड ट्रक भोवती गर्दी होतेय.
advertisement
म्हणून सुरू केला फूड ट्रक
मीत बोरा व रेनिल जोशी यांनी आपल्या फूड ट्रकला युनिक नाव दिले आहे. बीई बाइट्स म्हणजेच बॉम्बे इंजिनिअर बाईट असे या फूड ट्रॅकचे नाव आहे. मित व रेनिल दोघेही इंजिनियरचे विद्यार्थी होते. हॉस्टेलमध्ये राहत असताना ते विविध पदार्थ स्वतः तयार करून खात असत. असेच एकदा न्यूयॉर्क पद्धतीचा बॅगल्स प्रकार त्यांनी तयार केला व तो सर्वांनाच आवडला. दोन ते तीन वर्ष ते दोघे क्लाऊड किचन चालवत होते. उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांनी स्वतःचे फूड ट्रक सुरू केले.
Thekua Recipe : छठपूजा स्पेशल ठेकुआ हा बिहारी पदार्थ कसा बनवतात? पाहा पारंपारिक रेसिपी
काय आहे बॅगल्स?
बॅगल हा प्रकार न्यूयॉर्कमधील एक रोजचा ब्रेड बटर प्रमाणे पदार्थ आहे. मैद्याच्या पीठाने तयार केलेला बॅगल हा ब्रेडचा एक प्रकार आहे. ते दिसायला तर डोनट सारखे असतात पण ते गोड नसतात. त्याचा वरील भाग कुरकुरीत असून त्याच्या आतले स्टफिंग हे विविध फ्लेवरचे तयार करता येतात.
कसे तयार करतात बॅगल्स?
बीई बाईट या फूड ट्रकवर न्यूयॉर्क व महाराष्ट्राचे एक युनिक कॉम्बिनेशन बॅगल खवय्यांना खाता येईल. बॅगल्स स्टफिंग तयार करणे अतिशय सोपे आहे. एका वाटीत शिमला मिरची, कांदा, टोमॅटोचे काप टाकून, त्यात मिरचीचा ठेचा व होममेड चीझसॉस, ऑरगॅनो व पिज़्ज़ा स्प्रेड एकत्र करून घ्यावे. बॅगल्स ब्रेडला कापून त्याचा आतल्या दोन्ही बाजूंना चीझसॉस लावून घ्यावा. त्यावर तयार स्टफिंग टाकून चीझसॉस सोबत सर्व्ह करावे.
फूड ट्रकवरील खास डिश
या फूड ट्रकचे मेन्यू हे अधिक लक्षवेधी आहेत. या ठिकाणी 'बॅचलर ऑफ बॅगल्स' मध्ये नऊ विविध प्रकारचे बॅगल्स मिळतील. “बॅकबेंचर कुलर्स” मध्ये सात प्रकारचे थंड प्येय मिळतील. 'थर्मो डायनामिक्स ऑफ पाव' मध्ये मसाला पाव, ठेचा पाव असे सात वेगवेगळे महाराष्ट्रीयन स्नॅक्स प्रकार मिळतील. 'एटीकेटी स्पेशल' मध्ये ब्राउनी व मूस असे पाच वेगवेगळ्या प्रकारच्या डेझर्टचा आस्वाद या ठिकाणी घेता येईल.
दरम्यान, हे फुड ट्रक प्युअर व जैन पदार्थांचे आहे. येथील पदार्थांच्या किमती देखील अतिशय पॉकेट फ्रेंडली आहेत. 40 ते 200 रुपयांपर्यंत या ठिकाणी पदार्थांचा आस्वाद घेता येईल, अशी माहिती बीई बाइट्सचे मालक मित बोरा यांनी दिली आहे.